रत्नागिरी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत १३ ऑगस्टला सभेचे आयोजन

रत्नागिरी : जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदारांच्या विविध प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी १३ ऑगस्टला सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी साडेदहा वाजता शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात ही सभा होणार आहे, अशी माहिती बागायतदार, शेतकरी संघटनेचे नेते प्रकाश उर्फ बाबा साळवी यांनी दिली.

शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या आर्थिक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सरसकट कर्जमाफीची मागणी, माकडांमुळे शेतीच्या होणाऱ्या नुकसानीवर प्रभावी उपाययोजनांवर चर्चा, अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळवून देणे, स्मार्ट मीटरबाबत असलेला विरोध आदी शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या आणि शंकांचे निवारण करण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. सभेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेणे आणि त्यावर एक ठोस कृती आराखडा तयार करणे हा आहे. सभेतील चर्चेनंतर, सर्व प्रश्नांवर आधारित एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले जाईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 AM 09/Aug/2025