रत्नागिरी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात विधी सेवा केंद्र सुरू

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात वीर परिवार सहायता योजनेअंतर्गत विधी सेवा केंद्र स्थापन करण्यात आले. त्याचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अतिकिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी राजेंद्र रा.पाटील यांच्या हस्ते झाले.

यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रविंद बिरादार, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्याधर ताटे, कार्यालयीन कर्मचारी तसेच वीरनारी, वीर माता-पिता, सर्व तालुका सैनिक संघटनांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष व माजी सैनिक उपस्थित होते.

या केंद्रामुळे आजी/माजी सैनिक, वीरपत्नी, वीर माता-पिता व अवलंबितांना कायदेशीर मार्गदर्शन आणि मोफत सेवा मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. पदापत्र, पेन्शन, जमिनीचे हक्क, न्यायालयीन प्रकरणे यांसारख्या विषयांवर त्वरित आणि विनामूल्य सल्ला देण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे.

या उपक्रमामुळे आजी/माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांची कायदेशीर साक्षरता वाढून, आपले हक्क व सुविधा याविषयी जागरूकता निर्माण होईल. सैनिकांच्या योगदानास सन्मान देणारा हा उपक्रम म्हणजे त्यांच्या सेवेप्रती कृतज्ञतेची प्रत्यक्षात उतरलेली भावना आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 09-08-2025