लांजा : लांजा नगरपंचायतीच्या प्रारूप विकास आराखड्याबाबत असलेल्या हरकती लक्षात घेऊन त्या तपासून कार्यवाही करावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. त्यामुळे या प्रारूप विकास आराखड्याला स्थगिती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लांजा नगरपंचायतीच्या वतीने प्रारूप विकास आराखडा जाहीर करण्यात आल्यानंतर सुरुवातीपासूनच या आराखड्याला लांजा आणि कुवे येथील नागरिकांनी कडाडून विरोध केला आहे. लोकांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता हा आराखडा तयार करण्यात आला आहे. लोकांच्या घरादारासह मालमत्तेचेदेखील मोठे नुकसान होणार असल्याने या आराखड्याला स्थगिती मिळावी, यासाठी राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकासमंत्री नीतेश राणे यांचीदेखील लांजा कुवे बचाव समितीच्या वतीने भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात आले होते.
मुंबईत शिष्टमंडळाने आमदार रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन या विकास आराखड्याला स्थगिती मिळावी, असे निवेदन सादर केले होते. या साऱ्या घडामोडीत मत्स्य व बंदरेविकासमंत्री नीतेश राणे त्याचप्रमाणे आमदार रवींद्र चव्हाण यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले होते. लांजा नगरपंचायतीच्या वतीने लोकांवर लादण्यात आलेल्या विकास आराखड्याला तातडीने स्थगिती मिळावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री फडणवीस यांनी लांजा शहराच्या विकास आराखड्याला लोकांच्या आलेल्या विरोध आणि हरकती तपासून कार्यवाही, करावी अशा सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 AM 09/Aug/2025














