रत्नागिरी : जिल्हा सहकारी बोर्डाच्या अध्यक्षपदी nिवड झाल्याबद्दल पत्रकार हेमंत वणजु यांचा शिवसेना आणि भाजप पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला. सहकार पॅनेलचे जिल्हा सहकार बोर्डावर निर्विवाद वर्चस्व असून, नवनिर्वाचित संचालकांनी कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या मान्यतेने वणजु यांची अध्यक्षपदी निवड केली होती. त्यांच्या या निवडीबद्दल दोन्ही प्रमुख पक्षांनी अभिनंदन करत त्यांचा गौरव केला.
हेमंत वणजु हे ‘रत्नागिरी खबरदार’ या वृत्तपत्राचे संपादक असून, गेल्या १२ वर्षांपासून ते पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. या दीर्घ कालावधीत त्यांनी सर्वच राजकीय पक्षांशी अत्यंत सलोख्याचे संबंध जपले आहेत, ज्यामुळे त्यांचे सर्वपक्षीय नेतृत्वाकडून कौतुक होत आहे.
या सत्काराच्या वेळी शिवसेनेकडून शहर प्रमुख बिपीन बंदरकर, ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये, सुदेश मयेकर, संजय साळवी, अल्ताफ संगमेश्वरी, बंटी कीर, बाळू गांगण, शिवलकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेश कुलकर्णी, मुन्ना चवंडे, सचिन करमरकर, केदार पटवर्धन, पत्रकार प्रणव पोळेकर, मुश्ताक खान आदींनी हेमंत वणजु यांचा सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
वणजु यांच्या निवडीमुळे जिल्हा सहकार बोर्डाच्या कामकाजाला नवी दिशा मिळेल आणि सहकार क्षेत्राच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास या वेळी उपस्थितांनी व्यक्त केला.









