हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या एकाला देवरुख पोलिसांकडून अटक

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव चव्हाणवाडी येथे अवैध हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला देवरुख पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. त्याच्याकडून नऊ लीटर गावठी दारू आणि इतर संबंधित साहित्य जप्त करण्यात आले आहे.

८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११.५० वाजण्याच्या सुमारास, देवरुख पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संजय करांडे यांना कोंडगाव चव्हाणवाडी येथील एका दगडी बांधाजवळ उघड्या जागेत एका व्यक्तीच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, तो व्यक्ती बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करत होता.

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन छापा टाकला. त्यावेळी, रुपेश सुरेश माने (वय ३८, रा. कोंडगाव) हा बेकायदेशीरपणे, कोणत्याही परवान्याशिवाय गावठी दारू विक्री करताना आढळून आला. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून ९५० रुपये किमतीची ९ लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली. या दारूसह इतर साहित्यही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) नुसार रुपेश माने याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची नोंद ८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ४.२१ वाजता करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास देवरुख पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 09-08-2025