काळबादेवी समुद्रात मासेमारी करताना तोल जाऊन पडलेल्या मच्छिमाराचा मृतदेह सापडला

रत्नागिरी : काळबादेवी येथील समुद्रात मासेमारी करताना तोल जाऊन बेपत्ता झालेल्या गजानन महादेव पेडणकर (वय ४५, रा. नेवरे) यांचा मृतदेह स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांच्या शोध मोहिमेनंतर अखेर ८ ऑगस्ट रोजी समुद्राच्या पाण्यात सापडला. या घटनेमुळे नेवरे आणि काळबादेवी परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गजानन पेडणकर हे ७ ऑगस्ट २०२५ रोजी नेहमीप्रमाणे मासेमारी करण्यासाठी काळबादेवी येथील जेटीजवळ आपल्या बोटीवर गेले होते. मासेमारी करत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते बोटीवरून खाली समुद्राच्या पाण्यात पडले. ही घटना लक्षात आल्यानंतर स्थानिक मच्छिमारांनी आणि कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु ते सापडले नाहीत.

या घटनेनंतर, गजानन पेडणकर बेपत्ता असल्याची तक्रार समीर अशोक शेट्ये यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली होती. पोलिसांनी तात्काळ बेपत्ता नोंद (रजि. नं. १७/२०२५) करून शोधकार्य सुरू केले. पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थ गेल्या २४ तासांपासून समुद्राच्या किनारी आणि पाण्यात गजानन यांचा शोध घेत होते. अखेर, ८ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास, काळबादेवीच्या समुद्रात त्यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला.

यानंतर, पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. या दुर्दैवी घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यू क्रमांक ६६/२०२५ नुसार करण्यात आली आहे. या घटनेमुळे पेडणकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 09-08-2025