रत्नागिरी : अवेळी पावसामुळे २०१५ ला रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतीचे मोठे नुकसान झालेले होते. त्यामधून सावरण्यासाठी शासनाने व्याजमाफी आणि कर्ज पुनर्गठनाचा दिलासा दिला होता; मात्र अटीशर्तीमुळे काही शेतकरी वंचित राहिले होते. पंचनामे उपलब्ध नसतील तरीही बाधित बागायतदारांना व्याजमाफी दिली जावी, असा निर्णय चार दिवसांपूर्वी शासनाने घेतलेला आहे. फेब्रुवारी आणि मार्च २०१५ मध्ये या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात अवेळी पाऊस व गारपिटीमुळे शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले होते. आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना ३ महिन्यांची व्याजमाफीची रक्कम पंचनामे उपलब्ध असण्याच्या अटीवर देण्यात आली होती. ही अट विचारात घेऊन रत्नागिरी जिल्ह्यातील ६५२ पात्र खातेदारांना ५५ लाख ८२ हजार रुपयांची व्याजमाफी देण्यात आली तथापि, निवासी उपजिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी १९ सप्टेंबर २०२४ ला शासनाला सादर केलेल्या अहवालानुसार फेब्रुवारी आणि मार्च २०१५ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अवेळी पाऊस व गारपीटमुळे आंबा
बागायतीचे २४ हजार ७४४.०४ हेक्टर आणि काजू बागायतीचे १३ हजार ५४३.६५ हेक्टर असे एकूण ३८ हजार २८७.६९ हेक्टर क्षेत्राचे ५० टक्केपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. यामध्ये ८७ हजार ३६१ शेतकरी बाधित झालेले होते.
ही बाब विचारात घेऊन पंचनामे उपलब्ध नसलेल्या शेतकऱ्यांना व्याजमाफीचा लाभ मिळाला नव्हता. कर्जदार शेतकऱ्यांना व्याजमाफीचा लाभ मिळणे आवश्यक असल्यामुळे पंचनाम्याची अट वगळण्याबाबत विचार सुरू होता. फेबुवारी व मार्च २०१५ मध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ३ महिनांच्या व्याजमाफीची रक्कम करण्यासाठी पंचनाम्याची अट वगळण्यात आली आहे. त्यामुळे आंबा व काजू बागायतदारांना दिलासा मिळणार आहे.
शासनाने अट शिथिल केल्यामुळे २०१५ मध्ये बाधित झालेल्या बागायतदारांना दिलासा मिळालेला आहे. नुकसान झालेल्या बागायतदारांना सरसकट लाभ दिला जाणार आहे. – प्रसन्न पेठे, आंबा बागायतदार
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:25 PM 18/Oct/2024














