राजापूर : तालुक्यातील भू सरफरेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गडगा घालून अडथळा निर्माण केल्यामुळे गेले वर्षभर ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. पूर्वी रहदारीसाठी खुला असलेला रस्ता अडथळ्यामुळे ग्रामस्थांसाठी अडचणीचा व धोकादायक झाला आहे. याविषयी तक्रार करूनही त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी स्वातंत्र्यदिनी (ता. १५) उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात सरफरेवाडीतील गुरे वाड्याकडे जाण्याचा, शेती अवजाराची ने-आण करण्याचा, तसेच सरफरे समाजाची आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलालादेवी मातेच्या स्थानाकडे जाण्याचा हा रस्ता आहे. सरफरेवाडीत रिक्षा आणण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे वयस्कर अथवा आजारी व्यक्तीला अक्षरश उचलून एसटीच्या रस्त्यापर्यंत न्यावे लागते. हा रस्ता कच्चा आहे. त्या रस्त्याची ग्रामपंचायतीच्या अभिलेखात नमुना नंबर २३ ला नोंद करण्यात आली आहे. हा रस्ता डांबरी करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे निधीही आलेला आहे. परंतु रस्त्यावरील अडथळा दूर न केल्यामुळे काम रखडले आहे.
तहसीलदारांनीही दिलेल्या आदेशाकडे दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत भू ग्रामपंचायतीचे प्रशासक, ग्रामसेवक यांच्याविरोधात त्वरित कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. त्याची दखल पंचायत समितीने घेतली नाही. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी (ता. १५) सकाळी १० वाजता भू ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे निवेदनाद्वारे जाहीर केले आहे. त्यावर अमित सरफरे यांच्यासह २१ ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 AM 11/Aug/2025














