लांजा प्रारूप विकास आराखड्यावर हजारांवर हरकती

लांजा : लांजा शहराच्या प्रारूप विकास आराखड्यावर आलेल्या नागरिकांच्या हरकतींवरील सुनावणीची प्रक्रिया सलग चार दिवसांत पूर्ण झाली आहे. या सुनावणीनंतर प्रशासनाकडून नागरिकांना आवश्यक असलेले बदल होणार की थातुरमातुर बदल करून प्रशासन हा विकास आराखडा रेटून नेणार याकडे आता लांजावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

टंडन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने कार्यालयात बसून तयार केलेल्या या प्रारूप विकास आराखड्याला सुरुवातीपासूनच लांजा व कुवे येथील नागरिकांनी विरोध केला असून या विरोधात १५१२ हरकती लांजा नगर पंचायतीकडे दाखल केल्या होत्या. या हरकतीवर सुनावणी घेण्यात आली. पहिल्या दिवशी ३४०, दुसऱ्या दिवशी २८५, तिसऱ्या दिवशी ३०२ आणि शेवटच्या दिवशी तब्बल ४०० अशा एकूण १,३२७ हरकतींवर सुनावणी झाली. या सुनावणी प्रक्रियेनंतर आता संबंधित शासकीय यंत्रणांकडून या हरकतींचा आढावा घेत अंतिम सुधारित विकास आराखडा तयार केला जाणार आहे.

लांजा-कुवे परिसरातील विविध भागांतून आराखड्याविरोधात मोठ्या प्रमाणावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून अनेकांनी आराखड्यातील त्रुटीवर बोट ठेवले आहे. अशाच वेळी प्रशासनाकडून या हरकतींचा विचार करून खरोखरच अपेक्षित बदल होणार की प्रशासनाकडून सुनावणीचा केवळ फार्स ठरणार? याकडे लांजा शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, सुनावणीची प्रक्रिया पार पडली असली तरी मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नीतेश राणे, तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी या विकास आराखड्याला स्थगिती मिळावी, अशी मागणी केली होती. त्यावर नागरिकांच्या आलेल्या हरकती तपासून कार्यवाही करावी, अशा सूचना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. त्यामुळे विकास आराखड्याला स्थगिती मिळणार की प्रशासनाकडून हरकतीवर घेण्यात आलेल्या सुनावणी प्रमाणेच कार्यवाही होणार हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

सुनावणी प्रक्रिया जलद
सुनावणी प्रक्रियेत पहिल्या दिवशी ३४०, दुसऱ्या दिवशी २८५, तिसऱ्या दिवशी ३०२ आणि शेवटच्या दिवशी तब्बल ४०० अशा एकूण १.३२७हरकतींवर सुनावणी झाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:03 PM 11/Aug/2025