खेड-कांदोशी एसटी फेरी वडगाव खुर्दपर्यंत सुरू करण्याची मागणी

खेड : हंगामी स्वरूपात सुरू असलेल्या ठाणे-खेड-कांदोशी एसटी फेरी गाडीला वडगाव खुर्दपर्यंत वाढवावे, अशी आग्रही मागणी वडगाव बुद्रूक येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत मोरे यांनी ठाणे विभाग नियंत्रक, विभागीय वाहतूक अधिकारी तसेच परिवहन मंत्री यांच्याकडे केली आहे.

खेड तालुक्यातील भरणे, सुकवली, आंबवली, साठवस्थान केंद्र, कांदोशी, कळमणी खुर्द, जाधववाडी, वडगाव बुद्रुक आणि वडगाव खुर्द या परिसरातील नागरिकांना पहाटे खेडकडे येण्यासाठी ही एसटी सेवा उपयुक्त ठरेल. विशेषतः पहाटे तीन वाजल्यापासून पुणे, मुंबई व अन्य भागांतून खेडमध्ये येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता, ही फेरी गाडी पहाटे चार-साडेचारच्या सुमारास वडगाव खुर्दपर्यंत चालविणे योग्य ठरेल, असे मोरे यांनी म्हटले आहे.

सध्या ही गाडी फक्त कांदोशीपर्यंत धावते. मात्र तेथून पुढे वडगाव खुर्द फक्त चार किलोमीटर अंतरावर आहे. अशा परिस्थितीत या भागातील नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी ही सेवा वडगाव खुर्दपर्यंत नियमित सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

ठाणे विभाग नियंत्रक यांनी या मागणीबाबत सकारात्मक भूमिका दर्शवली असून पाहणी करून निर्णय घेतला जाईल, अशी शक्यता आहे. सणासुदीच्या काळात गाड्यांमध्ये होणारी गर्दी व प्रवाशांचे हाल लक्षात घेता ही सेवा विस्तारण्याचे प्रयत्न लवकरच अपेक्षित आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:57 PM 11/Aug/2025