चिपळूणमध्ये ‘श्री शिवराज्याभिषेक सोहळा’ विषयावर राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन

चिपळूण : आखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेशी संलग्न बालरंग परिषद तर्फे ‘इतिहास महाराष्ट्राचा – श्री शिवजन्मोत्सव ते श्री शिवराज्याभिषेक सोहळा’ या विषयावर भव्य राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये एकल आणि समूह असे दोन गट असतील. एकल गट १ मध्ये ५ ते १० वर्षे वयोगटातील तर एकल गट २ मध्ये ११ ते १५ वर्षे वयोगटातील बालकलावंत सहभागी होतील. समूह गटात ४ ते ८ बालकलावंतांचा सहभाग आवश्यक असणार आहे.

ही स्पर्धा १२ ऑगस्ट रोजी सकाळी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे होणार आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी ५ ते १५ ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रातील शाखास्तरावर घेण्यात येणार असून, प्रत्येक गटातील प्रथम व द्वितीय क्रमांकाचे विजेते अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. एकल गट १ मधील सहभागी बालकांनी छत्रपती शिवाजी महाराज किंवा त्यांच्या काळातील अन्य ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांची भूमिका साकारून महाराजांचे वालपण, शौर्य, शिक्षण, पराक्रम तसेच राजमाता जिजाऊंची प्रेरणा या विषयांवर नाट्य, नृत्य आणि गायन यांचा समन्वय साधून पाच मिनिटांचे प्रभावी सादरीकरण द्यायचे आहे.

एकल गट २ व समूह गट यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतच्या कालखंडातील शौर्यगाथा, गडकिल्ल्यांवरील विजय आणि ऐतिहासिक प्रसंगांचा संदर्भ घेऊन सादरीकरण करायचे आहे. समूह सादरीकरणासाठी दहा मिनिटांचा अवधी असेल आणि यात नृत्य, नाट्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला किंवा इतर कला प्रकारांचा समन्वय करता येईल.
सर्व सहभागी व विजेत्यांना प्रशस्तिपत्र देण्यात येईल. अंतिम फेरी मुंबई येथे २३ व २४ ऑगस्ट रोजी होणार आहे. अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या स्पर्धकांचा प्रवास खर्च आयोजकांकडून दिला जाणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:28 PM 11/Aug/2025