रत्नागिरी : धार्मिक स्थळे, रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्थेजवळ तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास निर्बंध

रत्नागिरी : जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाचे जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत (दि. 25 नोव्हेंबर 2024 पर्यंत) निर्बंध घालण्यात येत असल्याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले आहेत.

भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठीचा कार्यक्रम 15 ऑक्टोबर रोजी घोषीत केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये, किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाचे जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर भारतीय नागरिक सुरक्षा संहीता, 2023 चे कलम 163 अन्वये जिल्हादंडाधिकारी एम. देवेंदर सिंह यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन त्यांनी निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत (दिनांक 25 नोव्हेंबर 2024 पर्यंत) निर्बंध घालण्यात येत असल्याबाबतचे आदेश दिले आहेत.

प्रत्येक इसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनी क्षेपकावर पोलीस विभागाने जाहीर करुन त्यास प्रसिध्दी करावी, असेही आदेशात म्हटले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:14 18-10-2024