रत्नागिरी – रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे येथील पोस्ट ऑफिसमध्ये चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी कुलूप तोडून कार्यालयात प्रवेश केला, तसेच तिजोरी फोडण्याचाही प्रयत्न केला, मात्र त्यांना काहीही हाती लागले नाही. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोतवडे पोस्ट ऑफिसच्या उपडाकपाल श्रीमती मृण्मयी महेश महामनी (वय ५३) यांनी या घटनेबाबत फिर्याद दाखल केली आहे. ९ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५.१५ ते १० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११.०० या वेळेत ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी पोस्ट ऑफिसच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर, त्यांनी तिजोरी असलेल्या खोलीच्या (ट्रेझरी रूम) दरवाजाचेही कुलूप तोडले.
आत प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी कोणत्याही धारदार वस्तूने तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना त्यात यश आले नाही. त्यामुळे पोस्ट ऑफिसमधून कोणतीही मौल्यवान वस्तू किंवा रक्कम चोरीला गेलेली नाही.
१० ऑगस्ट रोजी रात्री १०.५२ वाजता या घटनेची तक्रार दाखल करण्यात आली. भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३३१(४) आणि ६२ नुसार अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा (गु.र.नं. १५७/२०२५) नोंदवण्यात आला आहे. रत्नागिरी ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:33 PM 11/Aug/2025














