रत्नागिरी : जिल्ह्यात ‘ड्राय’ विंधन विहिरींमुळे पाऊण कोटीचा खर्च वाया

रत्नागिरी : उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना म्हणून जिल्ह्यात २६८ विंधन विहिरींची खोदाई करण्यात आली. त्यासाठी २ कोटी ६१ लाख ९० हजार रुपये खर्च प्रस्तावित होता. त्यापैकी ११० विहिरी कोरड्या (ड्राय) गेल्या आहेत. त्यामुळे प्रस्तावित करण्यात आलेल्या खर्चापैकी सुमारे पाऊण कोटीचा खर्च वाया गेला आहे.

जिल्ह्याचा बहुतांश भाग कातळयुक्त आहे. सरासरी साडेतीन हजार पाऊस पडूनही मोठ्या प्रमाणात पाणी नदीनाल्यातून वाहून जाते. त्यामुळे दरवर्षी जिल्ह्यात उन्हाळ्यामध्ये ग्रामीण भागातील ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. सुमारे ३०० ते ४०० वाड्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. दरवर्षी संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करून पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येतात.

गतवर्षी जिल्ह्यातील १५२ गावांतील २६८ वाड्यांमध्ये प्रत्येकी एक अशा २६८ विंधन विहिरींची खोदाई प्रस्तावित होती. विहिरींच्या खोदाईसाठी मनुष्यबळ तसेच खोदाईचा खर्चही जास्त होतो. हे टाळण्यासाठी विंधन विहिरींची खोदाई करण्यात येते. विहिरींपेक्षा विंधन विहिरींवर खर्च कमी येत असल्याने अगदी कमी जागेतही त्यांची खोदाई करता येते. त्यामुळे आता जिल्ह्यात विहिरींऐवजी विंधन विहिरींची खोदाई करण्यात येते. मात्र, अनेकदा विंधन विहिरींना पाणीही लागत नाही. त्यामुळे खोदाई करण्याचा खर्च वाया जातो.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:51 PM 18/Oct/2024