रत्नागिरी : जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर सीसीटीव्हीची नजर

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन पूर्ण सज्ज आहे. जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील १,७४७ मतदान केंद्रावर सुमारे ४.५० कोर्टीच्या मुलभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत. प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्हीची नजर असणार आहे. जिल्ह्यातील १३ लाख २३ हजार ४१३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, त्यामध्ये २०,८७१ युवा मतदार पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिह यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोकणात येणाऱ्या गोवा बनावटीच्या मद्यासह अमली पदार्थांच्या तस्करीवर करडी नजर ठेवली जाणार आहे. विविध विभागाचे पथक तयार करण्यात येणार आहे. जिल्ह्यांतर्गत ५ तपासणी नाक्यांवर कडक वाहनांची तपासणी केली जाणार आहे. दारू, ड्रग्ज व रोकड जप्तीसाठी अधिक दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचेही स्पष्ट करून जिल्ह्यात पोस्टर, कटआऊट, बॅनर असे जवळपास ५ हजारांहून अधिक जाहिरात साहित्य जप्त करण्यात आल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीसाठी १ कोटी २६ लाख रुपये मतदान केंद्र दुरुस्तीसाठी देण्यात आले आहेत, तर सर्व मतदान केंद्रावर सीसीटीव्ही बसवण्यासाठी तीन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ज्येष्ठ नागरिक व ८५ वर्षांहून अधिक मतदारांना मतदान करण्यासाठी व त्यांच्या मदतीसाठी कर्मचाऱ्यांबरोबरच एनसीसी व एनएसएसच्या विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे. पाचही मतदारसंघातील मतदारांमध्ये पुरुषांची संख्या ४८ टक्के, तर महिलांची संख्या ५२ टक्के इतकी आहे. जिल्ह्यात ६.९२५ दिव्यांग मतदार आहेत. जिल्ह्यात १७४७ मतदान केंद्र असून, यात ३२ नवीन केंद्रे आहेत. शहरी भागात १८४ तर ग्रामीण भागात १५६३ मतदान केंद्र असल्याचे सिंह यांनी सांगितले.

हिस्ट्रीशिटर’वर नजर
जिल्ह्यात पाच चेकनाके आंतरजिल्हा बॉर्डरवर तयार करण्यात आले असून, याठिकाणी अचानक भेटी दिल्या जाणार आहेत. जिल्ह्यात पोलिसांच्या मदतीला १२० जणांची केंद्रीय औद्योगिक बलाची कंपनी दाखल झाली आहे. सध्या हिस्ट्रीशिटरची यादी तयार केली जात असून, त्यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:01 PM 18/Oct/2024