गुहागरसाठी भाजप व शिंदे शिवसेनेत रस्सीखेच

चिपळूण : गुहागर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारासमोर अद्याप महायुतीचा उमेदवारच मिळालेला नाही. प्रत्येकवेळी वेगवेगळी नावे समोर येत असून, आयत्यावेळी गुहागरमध्ये वेगळी गणिते मांडण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. गुहागरचे विद्यमान आमदार व शिवसेना नेते आ. भास्कर जाधव यांच्याविरोधात अजूनही महायुतीचा उमेदवार ठरत नसून ही जागा भाजपला द्यायची की शिंदेंची शिवसेना लढणार यावरून रस्सीखेच सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीत कोकणातून शिवसेना चिन्हच गायब झाले होते. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपचे कमळ तर रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह रिंगणात होते व या चिन्हांवर नारायण राणे व सुनील तटकरे खासदार म्हणून निवडून आले. आता विधानसभा निवडणुकीत भाजपचे कमळ चिन्ह असणार की नाही असा प्रश्न भाजपच्या कार्यकत्यांना पडला आहे.

भाजपच्या माध्यमातून गुहागर विधानसभा मतदारसंघावर दावा करण्यात येत आहे. त्यासाठी माजी आ. डॉ. विनय नातू आणि त्यांचे कार्यकर्ते जोरदार प्रयत्न करीत आहेत. काहींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली असून, भाजपकडून गुहागरसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, शिंदेंच्या शिवसेनेकडून सुरुवातीलाच विपुल कदम, त्यानंतर आता जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांचेही नाव समोर आणले जात आहे. त्यामुळे आ. भास्कर जाधव यांच्याविरोधात या मतदारसंघात उमेदवार निश्चित झालेला नाही. त्यामुळे आयत्यावेळी महायुती कोणता उमेदवार देणार या बाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. या जागेसाठी भाजप आणि शिंदे शिवसेनेत रस्सीखेच असून मध्येच बळीराज सेनेचे नावदेखील पुढे आणले जात आहे.

गुहागरमधून पिता की पुत्र
गुहागरचे विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी आपण २४ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असे सोशल मीडियातून जाहीर केले आहे. प्रत्यक्षात गुहागरमधून स्वतः आ. भास्कर जाधव उभे राहाणार की त्यांचे सुपुत्र व माजी जि. प. अध्यक्ष विक्रांत जाधव लढणार यामध्ये सस्पेन्स आहे. महायुतीकडून कोणता उमेदवार समोर येणार यावर पिता की पुत्र निवडणूक लढणार ही गणिते अवलंबून आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:14 PM 18/Oct/2024