जनतेला विश्वासात घेऊनच होणार आवश्यक बदल : आमदार किरण सामंत

लांजा : जनतेचे नुकसान करण्याचा माझा कोणताही हेतू नाही, त्यामुळे जे होईल ते चांगलेच काम होईल. मी कायमस्वरूपी तुमच्यासोबत असून, विकास आराखड्यात आवश्यक असलेल्या सर्व सुधारणा करून देण्याची जबाबदारी माझी आहे आणि ते मी करून देणार, असे आश्वासन आमदार किरण सामंत यांनी कुवे येथे ग्रामस्थांना दिले.

कुवे येथे नुकतीच विकासकामांची आढावा बैठक पार पडली, या प्रसंगी आमदार सामंत म्हणाले की, सर्वसामान्य जनतेला त्रास देऊन विकासकामे करणे, हा माझा अजिबात हेतू नाही. जी काही विकासकामे होतील ती जनतेला विश्वासात घेऊनच होतील.

गोरगरिबांची घरे तोडून मला विकास करायचा नाही, विकास आराखड्यात जे काही बदल सुचवले जातील त्या सर्वांचा विचार करून आवश्यक असलेल्या सर्व सुधारणा करून देण्याची जबाबदारी माझी आहे. मी जनतेसोबत असल्याने दिलेला शब्द पूर्ण करणार, याबाबत तुम्ही निश्चित राहा.

कुवे येथील डम्पिंग ग्राउंडसाठी पर्यायी जागा उपलब्ध करण्यात आली असून, कुवे येथे नगरपंचायतीच्या वतीने कचरा टाकणे बंद करण्यात आल्याचे विकासकामांचा आढावा बैठकीत जाहीर करताच कुवे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत आमदार सामंत यांचे आभार मानले.

विकासकामांच्या आढावा बैठकीत कुवे ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. सदर योजनांचा लाभ घेताना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यात आल्या आणि त्या सोडवण्यासाठी तजबीज केली. प्रस्तावित कामे व उर्वरित विकासकामांचा आढावा घेण्यात आला. त्याचप्रमाणे उर्वरित विकासकामे ३१ डिसेंबरपूर्वी पूर्ण केली जातील, असे देखील आमदार सामंत यांनी सांगितले.

बागुलबुवा थांबवायचा आहे
सध्या सुरू असलेला विकास आराखड्याचा बागुलबुवा मला थांबवायचा असून, होत असलेल्या राजकारणात मला पडायचे नाही. मतदारसंघातील आरोग्यव्यवस्था बळकट करणे, शिक्षणव्यवस्था सुधारणे, विजेच्या आणि पाण्याच्या समस्या सोडवणे तसेच इथली तरुण मुलं इथेच शिकतील आणि उद्योग व्यवसाय करतील हेच माझे व्हिजन आहे, असे सामंत यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 AM 12/Aug/2025