रत्नागिरी : जिल्ह्यातील महाधनेश पक्ष्यांच्या अधिवासात आणि खाद्य वृक्षांच्या संख्येत होणारी घट ही चिंताजनक बाब आहे. या पार्श्वभूमीवर संगमेश्वर तालुक्यातील देवळे येथे धनेशाची राई निर्माण करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. धनेश मित्र निसर्ग मंडळ आणि सह्याद्री संकल्प सोसायटीच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
देवळे येथे सह्याद्री संकल्प सोसायटी देवरुख, देवळे ग्राम समृद्धी अभियान, श्रीदेवी कालिश्री रवळनाथ मंदिर समिती, वनविभाग, आयडीबीआय बैंक देवरुख यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीदेव रवळनाथ मंदिराच्या परिसरातील देवराईत वृक्षारोपण करण्यात आले. सह्याद्री संकल्पचे कार्यकारी संचालक प्रतीक मोरे आणि विराज आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी बँक व्यवस्थापक प्रतीक मनवानी, चंद्रप्रकाश सैनी व अक्षांश टेंभुर्णे, महाराष्ट्र प्रादेशिक वनविभागाचे अधिकारी सहयोग कराडे व सूरज तेली उपस्थित होते. तसेच ग्राम समृद्धीचे प्रवर्तक नीलेश कोळवणकर, दीपक गुरव, यशवंत घागरे, चंद्रकांत साळवी, दिलीप शिर्के, भरत चव्हाण, विलास शिंदे, गजानन मोघे व चिपळूणचे कृषी अधिकारी जयेश काळोखे हे उपस्थित होते. महेंद्र चव्हाण व भरत चव्हाण या धनेश मित्रांच्या सहकार्यातून हा प्रकल्प देवळे गावात साकारत आहे.
बीज बँक तयार व्हावी
वृक्षांची केवळ लागवड करून न थांबता त्यातून अशा वृक्षांची शाश्वत बीज बँक तयार व्हावी आणि जंगलाचे शेतकरी असणाऱ्या धनेश पक्ष्यांच्या माध्यमातून या वृक्षांचा प्रसार व्हावा, अशी संकल्पना या प्रकल्पामागे आहे. या अधिवास पुनर्निर्मिती कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्था आणि व्यक्तींनी sahaydrisankalpsociety@gmail.c om या ठिकाणी आपला सहभाग नोंदवावा.
तीन हजार वृक्षांची लागवड
सह्याद्री संकल्प सोसायटी ही पर्यावरण संस्था, देवळे येथे त्यांचा हा उपक्रम गेली २०१८ सालापासून राबवत आहे. रत्नागिरी परिसरात दुर्मीळ होत चाललेल्या रान बिब्बा, चांदफळ, काळा धूप, गोयदडा, सुरंगी, बकुळ अशा तीन हजार वृक्षांची लागवड धनेश मित्र निसर्ग मंडळाने केली आहे. या वृक्षलागवडीत संस्थेने सातत्य राखले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:27 PM 12/Aug/2025














