रत्नागिरी : तयार अन्न पदार्थ ग्राहकांना देताना त्याच्या पॅकिंगसाठी वर्तमानपत्राचा वापर करू नये, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त नि. दि. मोहिते यांनी केले आहे.
सणासुदीच्या कालावधीमध्ये जनतेकडून मिठाई आणि अन्नपदार्थ खवा / मावा, तूप, रवा, मैदा, आटा, खाद्यतेल, वनस्पती तेल इत्यादींची मागणी मोठ्या प्रमाणात केली जाते. त्याअनुषंगाने श्री. मोहिते यांनी उत्पादक, विक्रेते आणि ग्राहकांना काही सूचना केल्या आहेत. त्यानुसार मिठाई तयार करताना केवळ फूडग्रेड खाद्य रंगाचा अत्यल्प प्रमाणात वापर करावा. सणासुदीच्या काळात मिठाई व इतर अन्नपदार्थांच्या सेवनामुळे विषबाधेसारखी अप्रिय घटना घडणार नाही याची जिल्ह्यातील मिठाई उत्पादक, विक्रेते व हॉटेल व्यवसायिकांनी दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील मिठाई उत्पादक/विक्रेते व हॉटेल व्यावसायिकांनी आस्थापनेचा परिसरपर्यावरणीय दृष्टीने आणि कीटकांपासून संरक्षित व स्वच्छ असावा. कच्चे अन्नपदार्थ परवानाधारक, नोंदणीधारक अन्न व्यावसायिकांकडून खरेदी करण्यात यावेत. अन्नपदार्थ तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा. पाणी पिण्यायोग्य असल्याबाबत अहवाल प्राप्त करून घ्यावा. तयार अन्न पदार्थ स्वच्छ व सुरक्षित ठिकाणीच व्यवस्थित झाकून ठेवावेत. आजारी व्यक्तीने अन्नपदार्थ हाताळू नयेत. मिठाई तयार करताना केवळ फूडग्रेड खाद्य रंगाचा अत्यल्प प्रमाणात वापर करावा (१०० PPM पेक्षा कमी). अन्नपदार्थ ग्राहकांना देताना, अन्नपदार्थ पॅकिंग करताना वर्तमान पत्राचा वापर करू नये. बंगाली मिठाई २४ तासांच्या आत खाण्याबाबत ग्राहकांना स्पष्ट निर्देश देण्यात यावेत. मिठाई बनविताना तसेच हाताळणाऱ्या व्यक्तींनी नेहमी डोक्यावर टोपी, मास्क, हातमोजे व स्वच्छ अॕप्रन वापरावा. मिठाईवर वापरला जाणारा सोनेरी व चांदीचा वर्ख योग्य दर्जाचा व उच्च प्रतीचा असावा. मिठाई हाताळताना हात वारंवार स्वच्छ धुवावे. अन्न व्यावसायिकांनी त्यांच्या आस्थापनेचे पेस्ट कंट्रोल करून घ्यावे व त्याचा अभिलेखा ठेवावा. आस्थापनेत कार्यरत अन्न हाताळणाऱ्या व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी व त्याचा अभिलेखा ठेवावा. अन्न आस्थापनेत २५ कर्मचाऱ्यांच्या मागे १ असे Fostac training प्राप्त Food Safety Supervisor नियुक्त करावे. जिल्ह्यातील मिठाई उत्पादक/ विक्रेते व हॉटेल व्यावसायिकांनी नमूद केलेल्या सर्व सूचनांचे पालन करावे. त्याचप्रमाणे सणासुदीच्या काळात मिठाई व इतर अन्न पदार्थाच्या सेवनामुळे विषबाधासारखी अप्रिय घटना घडणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी. अन्नपदार्थाच्या दर्जाविषयी ग्राहकांनी १८०० २२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर कोणत्याही प्रकारची तक्रार करावी, असेही सूचित करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:00 12-08-2025














