अंगारकी यात्रोत्सवानिमित्त गणपतीपुळेत ४० हजार पर्यटकांची हजेरी

गणपतीपुळे : अंगारकी चतुर्थीनिमित्त दिवसभरात सुमारे 40 हजारहून अधिक भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. पाऊस असतानाही भाविकांची प्रचंड गर्दी होती. सर्वाधिक गर्दी कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह बेळगाव मधील लोकांची होती.

रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे मंगळवारी अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव मोठ्या भक्तिभावात व उत्साहात पार पडला. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या हजारो भाविकांनी यावेळी ‘श्रीं’चे दर्शन घेतले.

येथे अंगारकी यात्रोत्सवाचे आयोजन संस्थान श्री देव गणपतीपुळे देवस्थानतर्फे अतिशय नियोजनबद्ध करण्यात आले होते. यावेळी अंगारकीच्या पार्श्वभूमीवर स्वयंभू ‘श्रीं’चे मंदिर पहाटे 3.30 वाजता खुले करण्यात आले. प्रारंभी गणपती मंदिराचे मुख्य पुजारी अभिजित घनवटकर यांच्या हस्ते ‘श्रीं’ची पूजा-अर्चा, मंत्रपुष्प व आरती झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात आले. त्या नंतर एकूण 18 तासांच्या कालावधीत चंद्रोदयानंतर रात्री 10.30 वाजेपर्यंत भाविकांना दर्शनाचा लाभ देण्यात आला. या अंगारकी चतुर्थीचा योग पवित्र श्रावण महिन्यात जुळून आल्याने स्वयंभू श्रींच्या दर्शनासाठी घाटमाथ्यावरील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. यावेळी स्वयंभू श्रींच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना पावसाची शक्यता लक्षात घेऊन दर्शनाची सोय सुलभ व्हावी, याकरिता संस्थान श्री देव गणपतीपुळेच्या वतीने मंदिर व देवबाग परिसरात दर्शन रांगा उभारून त्यावर खास पत्रे टाकून मंडप व्यवस्था करण्यात आली होती. मंदिर परिसरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याच्या तक्रारी लक्षात घेऊन खास आरोग्य सेवेसाठी मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय पथक तैनात ठेवण्यात आले होते. या पथकाने चोख कामगिरी बजावली.

उत्सवाला आलेल्या भाविकांच्या गर्दीदरम्यान समुद्र किनाऱ्यावर कुठलीही दुर्घटना घडू नये, यासाठी ग्रामपंचायतीचे जीवरक्षक, देवस्थानचे सुरक्षारक्षक आणि पोलीस यंत्रणेने किनाऱ्यावर विशेष गस्त घालून होते. भाविकांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था येथील सागर दर्शन पार्किंग, महालक्ष्मी हॉल परिसर पार्किंग, खारभूमी मैदान मालगुंड आणि अन्य मोकळ्या जागांच्या ठिकाणी करण्यात आली होती. इतर सर्व सोयीसुविधांसाठीची ग्रामपंचायत, देवस्थान समिती व अन्य सर्व यंत्रणांच्या वतीने करण्यात आली होती. यात्रोत्सवानिमित्ताने घाटमाथ्यावरील मिरज येथील न्यू संगम ग्रुप आणि आणि सांगली येथील नवप्रभात गणेशोत्सव मंडळाने आलेल्या भाविकांना खिचडी प्रसादाचे वाटप केले.

श्रींच्या पालखीची वाद्यांच्या गजरात मिरवणूक
यात्रोत्सवाच्या निमित्ताने संस्थान श्री देव गणपतीपुळेच्या वतीने सायंकाळी 4.30 वाजता गणपतीपुळे मंदिराच्या प्रदक्षिणामार्गे श्रींच्या पालखीची वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष करून संपूर्ण परिसर भक्तीमय करण्यात आला. या पालखी मिरवणुकीत संस्थान श्री देव गणपतीपुळेचे सरपंच डॉ. श्रीराम केळकर व त्यांचे सर्व पंच सहकारी, देवस्थानचे पुजारी व कर्मचारी, पोलीस कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:04 AM 13/Aug/2025