रत्नागिरी : चिपळूण येथे एकट्या राहणाऱ्या निवृत्त वृद्ध शिक्षिकेचा खून झाल्यानंतर वृद्धांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा पोलिस दलाने विशेष उपक्रम हाती घेतला आहे. ‘मिशन प्रतिसाद’ या उपक्रमाअंतर्गत वृद्ध नागरिकांसाठी एक कृती आराखडा तयार केला आहे. यानुसार, पोलिस ठाण्यातील बिट अंमलदार आणि पोलिसपाटील हे जिल्ह्यातील वृद्ध नागरिक, एकटे राहणाऱ्या ४५ वर्षांवरील व्यक्तींच्या घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. त्या अनुषंगाने एकटे राहणारे वृद्ध नागरिक आणि ४५ वर्षांवरील व्यक्तींचा सर्व्हे करून गरजू व्यक्तींची माहिती गोळा करून मदत केली जाईल, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली.
बगाटे म्हणाले, जिल्हा पोलिसांनी मिशन प्रतिसाद नावाचे एक अभिनव अभियान सुरू केले आहे. ज्याचा मुख्य उद्देश नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित आणि प्रभावी प्रतिसाद देणे हा आहे. या अभियानांतर्गत, विशेषतः वृद्ध नागरिकांना मदत करण्यावर भर दिला जात आहे. या अभियानानुसार, प्रत्येक पोलिस ठाण्यात एक ‘नोडल अधिकारी’ नेमण्यात आला आहे. हे अधिकारी नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी थेट त्यांच्याशी संपर्क साधतात. ज्यामुळे नागरिकांना छोट्या-मोठ्या समस्यांसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जाण्याची गरज उरलेली नाही. ‘मिशन प्रतिसाद चा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे, वृद्ध नागरिकांसाठी एक विशेष कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. पोलिस बिट अंमलदार आणि पोलिस पाटील हे वृद्ध नागरिक, तसेच एकटे राहणाऱ्या ४५ वर्षांवरील व्यक्तींच्या घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी मदत केली जाणार आहे. “मिशन प्रतिसाद “मुळे पोलिसांचे काम अधिक पारदर्शक होईल आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यास मदत होईल, जिल्ह्यातील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून, एकट्या आणि गरजू वृद्ध नागरिकांसाठी हा उपक्रम खऱ्या अर्थाने “प्रतिसाद” देणारा ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
वाढदिवसाला वृद्धांना शुभेच्छा पत्र
मिशन प्रतिसादअंतर्गत एक अनोखा भाग म्हणजे, वृद्ध नागरिकांना त्यांच्या वाढदिवशी पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या सहीचे शुभेच्छापत्र बिट अंमलदारांमार्फत दिले जाणार आहे. अशाप्रकारची अभिनव संकल्पना राज्यात प्रथमच रत्नागिरीत राबविण्यात येत आहे. या अभियानामुळे पोलिसांची कार्यक्षमता वाढणार असून, नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होईल, असा विश्वास बगाटे यांनी व्यक्त केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:59 PM 13/Aug/2025














