रत्नागिरी : ‘गो ग्रीन’ योजनेला अजूनही ग्राहक दाखवतात ‘लाल’ दिवा

रत्नागिरी : कागदाची बचत करून पर्यावरणाला हातभार लावण्यासाठी महावितरणने विजेचे छापील बिल नको असलेल्या ग्राहकांसाठी ‘गो ग्रीन’ योजना आणली आहे. या योजनेत छापील बिलाऐवजी ग्राहकांना इमेल किंवा एसएमएसद्वारे वीजबिल पाठवण्यात येते. मात्र अजूनही असंख्य ग्राहकांना बिलाचा कागद घरी आलेलाच महत्त्वाचा वाटतो. त्यामुळे जिल्ह्यातील सहा लाख २३ हजार २०९ ग्राहकांपैकी अवघ्या आठ हजार ४८४ ग्राहकांनीच या योजनेचा लाभघेतला आहे.

अनेक ठिकाणी निवासाच्या दाखल्यासाठी वीज बिलाची मागणी केली जाते. त्यामुळे अनेक ग्राहकांना ऑनलाइन वीजबिलांचा पर्याय फारसा पसंत नाही. मात्र गो ग्रीन योजनेमध्येही ऑनलाइन बिल उपलब्ध आहे. त्याची प्रींट काढून ती वापरता येऊ शकते. कागदांची गरज जितकी कमी होईल, तितके पर्यावरणाचे संवर्धन होईल, या हेतूने महावितरणकडून सातत्याने गो ग्रीन योजनेतील सहभागाचे आवाहन केले जात आहे.

योजनेचे फायदे
पर्यावरण संरक्षणासाठी ग्राहकांचे योगदान मिळते. ग्राहकांना प्रत्येक वीजबिलात सवलत देण्यात येते. यामुळे ग्राहकांचा वेळ व पैसा वाचतो. त्यामुळे ग्राहक कुठेही असतील तर त्यांना वीजबिल सहज तपासता येते.

नोंदणी कशी करावी ?
१ महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्या किंवा जवळच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा महावितरणच्या मोबाइल अॅपमध्येही ग्राहक गो ग्रीनमधील सहभाग नोंदवू शकतात.
ग्राहकांना नोंदणी करताना ग्राहक क्रमांक व इतर माहिती भरावी लागते. ग्राहकांनी नोंदणी पूर्ण केल्यानंतर त्यांच्या ई मेल आयडी किंवा मोबाइल क्रमांकावर दरमहा वीजबिल प्राप्त होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:29 PM 13/Aug/2025