पावस परिसरामध्ये ‘हर घर तिरंगा’ रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

पावस : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा रॅलीला पावस परिसरामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. या रॅलीमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग घेतला होता. पूर्णगड सागरी पोलिस ठाणे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पावस क्रमांक एक, पावस ग्रामपंचायत, स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिर पावस यांच्या संयुक्त विद्यमाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

ही रॅली विद्यामंदिर ते पावस बस स्थानक परिसरात काढण्यात आली. विविध घोषणा देत शालेय विद्यार्थ्यांनी रॅलीच्या माध्यमातून परिसरामध्ये जनजागृती केली. तसेच शिवार आंबेरे येथे पेजे महाविद्यालय ते जाकादेवी चौक यादरम्यान विविध घोषणांच्या माध्यमातून रॅली काढण्यात आली. त्यात शालेय विद्यार्थ्यांबरोबर ग्रामस्थांचा सहभाग होता. त्याचबरोबर गोळप पूल ते पावस बाजारपेठ मार्गे चौक अशी पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याच्या वतीने बाईक रॅली काढण्यात आली होती. त्यामुळे पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील परिसर हर घर तिरंगा रॅलीच्या माध्यमातून देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.

ही रॅली पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली. त्याला शालेय विद्यार्थ्यांबरोबर ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 AM 14/Aug/2025