कोकण रेल्वेला २०२३-२४ आर्थिक वर्षात ३०१ कोटींचा निव्वळ नफा

रत्नागिरी : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने स्थापनेपासूनचा सर्वाधिक निव्वळ नफा २०२३-२४ या आर्थिक वर्षांत मिळवला आहे. २०२३-२४ ला कॉर्पोरेशनत्य ४७०० कोटी रुपयांची उलाढाल झाली असून, ३०१ कोटींचा निव्वळ नफा प्राप्त झाल्याची माहिती कोकण रेल्वेच्या ३४ व्या स्थापनादिनाच्या सोहळ्यात कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

स्थापना दिवसाचा कार्यक्रम मडगाव येथील रवींद्र भवनात साजरा करण्यात आला. या सोहळ्यावेळी दीडशेहून अधिक कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी बेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कुमार झा, संचालक राजेश भडंग, आर. के. हेगडे उपस्थित होते. या वेळी झा यांनी सांगितले, पेडणे व ओल्ड गोवा येथील बोगद्यासाठी केंद्र सरकारने १५०० कोटी स्पये मंजूर केले असून ते काम लवकरच सुरू होईल.

त्यामुळे अनेक समस्या सुटू शकतील. त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी अनेक घोषणा केल्या. त्यात त्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्याला १७ हजार १५१ रुपयांचा सानुग्रह जाहीर केला आहे. कोकण रेल्वेने गेल्या आर्थिक वर्षात आतापर्यंतचा सर्वाधिक नफा ३०१ कोटी ७५ लाख कमावला आहे. यंदा १,७०० कोटीचे नवीन प्रकल्प राबवले असून त्यात ८५० कोटी विद्युतीकरणासाठी, अभियांत्रिकी कामासाठी ७६९ कोटी, सिग्नल आणि दूरसंचार कामांसाठी ६९ कोटी आणि यांत्रिक कामांसाठी १३ कोटींचा समावेश आहे. विविध विभागांमधील रिक्त जागांवर १९० जणांना नियुक्त्या दिल्या गेल्या आहेत तसेच ट्रैक मेंटेनन्स, पॉइंट्समन आणि इतर फ्रटलाइन कामगारांनी कोकण रेल्वे मार्गावर कार्यरत असताना महत्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल रोख पुरस्कार प्रदान केले आहेत. सायबर धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी कोकण रेल्वेने माहिती सुरक्षा व्यवस्थापन प्रणालीसाठी ISO २७००१:२०२२ प्रमाणपत्र घेतले आहे. यावर्षी २९ टक्के अधिक पाऊस झाला आहे. परिणामी, पेरनेम बोगद्यातील रूळावर माती साचल्यामुळे आणि नातूवाडी बोगद्याच्या प्रवेशद्वार माती घसरल्याने रेल्वे वाहतूक विस्कळित झाली होती. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तत्परतेने कार्यवाही करण्यात आली.

आयएसओ प्रमाणपत्र
सहा महिन्यांत कॉर्पोरेशनला १७०० कोटी रुपयांचे प्रकल्प मिळाले शिवाय कॉर्पोरेशनला दर्जा व्यवस्थापन सिस्टीम, आरोग्य व सुरक्षा व्यवस्थापन, पर्यावरणीय व्यवस्थापन, माहितीसाठी आयएमओ प्रमाणपत्र प्राप्त झाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:46 PM 18/Oct/2024