चिपळूण : चिपळूण गुहागर मार्गावरील रुंदीकरणप्रकरणी संपादित केलेल्या जागेच्या मोबदल्याचा प्रस्ताव येथील प्रांत कार्यालयाकडून राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे पाठवण्यात आला आहे. ११ गावांतील सुमारे २८ कोटी २५ लाखांचा मोबदला प्रस्तावित आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर सदरची रक्कम वर्ग केली जाणार आहे.
पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वीच मंत्रालयात गुहागर-विजापूर महामार्गावरील भूसंपादन मोबदला वितरणाबाबत बैठक घेण्यात आली होती. यापूर्वी प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी मोबदला वाटपाचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे पाठवला होता; मात्र नव्या शासननिर्णयानुसार चारपटऐवजी दुप्पट मोबदला देण्याची सूचना राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून करण्यात आली होती तसेच ७ वर्षांएवजी ५ वर्षातील व्याजाची रक्कम संबंधित लाभार्थ्यांना देण्याचे कळवले होते.
त्यानुसार पालकमंत्री सामंत यांनी मुंबईत घेतलेल्या बैठकीत दुप्पट मोबदला आणि ५ वर्षांचे व्याज देण्याचे सूत्र ठरले होते. त्यानुसार प्रांत कार्यालयाकडून नव्याने मोबदला वाटपाचा प्रस्ताव तयार करून तो दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे पाठवण्यात आला. त्यास आठवडाभरात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. मोबदला वाटपाचा तिढा सुटण्यासाठी काही पदाधिकारी तसेच प्रांताधिकारी सातत्याने प्रयत्न करत होते. काही दिवसांत यावर तोडगा निघणार असल्याचे समजते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:44 PM 14/Aug/2025














