रत्नागिरी : तब्बल दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर दुसऱ्या गणवेशासाठीचा निधी राज्य सरकारने दिला असून, रत्नागिरी जिल्ह्याच्या खात्यात एक कोटी ९२ लाख ६ हजार रुपये जमा झाले आहेत. आता ही रक्कम शाळांना वितरित करण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे.
समग्र शिक्षा अभियानांतर्गत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळेतील पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व मुली तसेच अनुसूचित जाती, जमाती व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलांना मोफत गणवेश देण्यात येतो. यावर्षीच्या शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला केवळ एक गणवेश, बूट व पायमोजे देण्यात आले होते. दुसऱ्या गणवेशासाठीच्या निधीची प्रतीक्षाच होती.
नियमानुसार शैक्षणिक सत्र सुरू होण्याच्या किमान एक महिना आधीच शाळांना दोन्ही गणवेश, बूट, पायमोजे यासाठी निधी मिळणे अपेक्षित होते. मात्र, शाळा सुरू होण्यापूर्वी केवळ एक गणवेश, बूट, पायमोजेसाठी निधी मिळाला. पहिल्याच गणवेशाचा निधी उशिरा मिळाल्याने शाळा व्यवस्थापन समितीला योग्य नियोजन करता आले नाही. दुसऱ्या गणवेशाचा निधी आता उपलब्ध झाला असला तरी स्वातंत्र्यदिनासाठी नवीन गणवेश विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे शक्य नाही.
मागणीनुसार पूर्ण निधी मंजूर
जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांना एक नियमित गणवेशासाठी पहिल्या टप्प्यात शासनाकडून एकूण ६४ हजार २० विद्यार्थ्यांसाठी प्रतिगणवेश ३०० रुपयांप्रमाणे एक कोटी २२ लाख ६ हजार रुपये मिळाले. एक जोडी बूट व दोन जोडी पायमोजांसाठी ६६ हजार २८९ पात्र विद्यार्थ्यांना एक कोटी १२ लाख ६९ हजार १३० रुपये मिळाले आहेत. आता दुसऱ्या गणवेशासाठी मागणीनुसार एकूण ६४ हजार २० विद्यार्थ्यांसाठी प्रतिगणवेश ३०० रुपयांप्रमाणे एक कोटी ९२ लाख ६ हजार रुपये मिळाले आहेत.
समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दुसरा गणवेश वितरित करण्यासाठी निधी प्राप्त झाला आहे. त्यानुसार शाळा व्यवस्थापन समितीस्तरावर गणवेश वितरित करण्याची सूचना केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांना देण्यात आली आहे- किरण लोहार, प्रभारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:06 PM 14/Aug/2025














