रत्नागिरीत राजकीय भूकंप! प्रशांत यादवांच्या हाती ‘कमळ’; नितेश राणेंनी केली मोठी घोषणा

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, जिल्ह्यातील एक प्रतिष्ठित आणि मोठे नेते म्हणून ओळखले जाणारे प्रशांत यादव लवकरच भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार आहेत. राज्याचे मत्स्य विभाग मंत्री आणि जिल्ह्याचे संपर्क मंत्री नितेश राणे यांनी आज पिंपळी येथील वाशिष्ठी डेअरीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ही अधिकृत घोषणा केली. या घोषणेमुळे जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

या पत्रकार परिषदेत बोलताना नितेश राणे यांनी प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. ते म्हणाले, “प्रशांत यादव हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक मोठे नेतृत्व आहेत. आम्ही त्यांच्याकडे केवळ एक कार्यकर्ता म्हणून नाही, तर एक नेता म्हणून पाहतो. वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून त्यांनी सहकार क्षेत्रात मोठे काम उभे केले आहे आणि अनेकांना रोजगार दिला आहे. असा मोठा नेता आमच्या पक्षात आल्यास भाजपची ताकद निश्चितच वाढेल.”

१९ ऑगस्टला मुंबईत पक्षप्रवेश सोहळा

प्रशांत यादव यांचा भाजपमधील प्रवेश सोहळा येत्या १९ ऑगस्ट रोजी मुंबईतील नरिमन पॉइंट येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार नारायण राणे यांच्यासह भाजपचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत, अशी माहितीही राणे यांनी दिली.

‘स्वबळावर लढल्यास ताकद वाढेल’ – राणेंचे सूचक विधान

यावेळी बोलताना नितेश राणे यांनी पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार शेखर निकम यांच्याविषयीही सूचक विधाने केली. ते म्हणाले, “पालकमंत्री उदय सामंत हे आमच्या मतदारसंघातील ज्येष्ठ मंत्री आहेत आणि प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. प्रशांत यादव यांनी आपली योग्यता ओळखून भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे तळागाळापर्यंत पोहोचलेले कार्यकर्त्यांचे जाळे पक्षाला मिळेल.” आमदार शेखर निकम हे महायुतीतच असल्याबद्दल विचारले असता, “प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आम्ही स्वबळावर लढलो, तरच आमची ताकद वाढेल,” असे म्हणत त्यांनी भविष्यातील राजकीय समीकरणांचे संकेत दिले.

२०२९ च्या विजयाचा विश्वास

नितेश राणे यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीची आठवण करून देत सांगितले की, “प्रशांत यादव यांचा गेल्या निवडणुकीत केवळ ६,८०० मतांनी पराभव झाला होता. त्यांची ताकद पाहता २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या पत्रकार परिषदेला माजी आमदार डॉ. विनय नातू, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, राजेश सावंत, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशांत यादव यांच्या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:36 14-08-2025