लांजा : ‘रद्द करा, रद्द करा, डंपिंग ग्राउंड रद्द करा,’ अशा घोषणा देत गुरुवारी सकाळपासून कोत्रेवाडी ग्रामस्थांनी लांजा शहर परिसर दणाणून सोडला. निमित्त होते ते लांजा नगरपंचायतीच्या डंपिंग ग्राउंडविरोधात कोत्रेवाडी ग्रामस्थांनी छेडलेल्या बेमुदत उपोषणाचे.
लांजा नगरपंचायतीने मनमानी कारभार करून डंपिंग ग्राउंड प्रकल्प प्रस्तावित केला आहे. या विरोधात कोत्रेवाडी ग्रामस्थांनी लांजा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडले आहे. या उपोषणाचा आज पहिला दिवस आहे. जोपर्यंत डंपिंग ग्राउंड हद्दपार होत नाही तोपर्यंत लढा चालू ठेवण्याचा निर्धार कोत्रेवाडी ग्रामस्थांनी केला आहे. आज गुरुवारी सकाळी दहा वाजल्यांपासून या उपोषणाला सुरुवात झाली आहे. यावेळी वाडीच्यावतीने मंगेश आंबेकर यांनी लांजा नगरपंचायतीने केलेल्या गैरकारभार आणि कोत्रेवाडी ग्रामस्थांवर लादलेल्या घनकचरा प्रकल्पाबाबत टीका केली.
ते म्हणाले की, लांजा नगरपंचायतीच्यावतीने कोत्रेवाडी येथे वाडीवस्तीलगत डंपिंग ग्राउंड प्रकल्प प्रस्तावित आहे. प्रकल्पाकडे जाण्यासाठी कोणताही अधिकृत रस्ता नाही. जवळ जलस्रोत आहेत. मुळातच हा प्रकल्प चुकीच्या पद्धतीने केला आहे. जिल्हा प्रशासनाने कोत्रेवाडी येथील प्रस्तावित जागा अयोग्य ठरवलेली असतानादेखील त्याची खरेदी केली गेली. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि हा प्रकल्प रद्द करून स्थलांतरित करावा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 AM 15/Aug/2025









