उमेदवारी अर्ज भरताना शक्‍ती प्रदर्शनास मनाई

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे वातावरण हळूहळू तापू लागले आहे. निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणे हा एक मोठा सोहळाच असतो; परंतु आता अर्ज दाखल करताना उमेदवार व कार्यकर्त्यांकडून होणाऱ्या उत्साहाला निवडणूक कार्यालय परिसरात निर्बंध येणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात येताना उमेदवारांना शक्तीप्रदर्शन करता येणार नाही. या वेळी वाहनांच्या ताफ्यामध्ये तीनपेक्षा जास्त मोटारगाड्यांचा समावेश नसावा. अर्ज दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात पाच व्यक्तींव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही त्याचबरोबर शक्‍तीप्रदर्शन करत मिरवणुका काढणे, सभा घेत घोषणा देणे, प्रचाराची गाणी, वाद्य वाजवण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. उमेदवारी अर्ज मंगळवारपासून (ता. २२) भरता येणार असून, शेवटची तारीख २९ ऑक्टोबर आहे. अनेकदा शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होते. या निमित्त राजकीय पक्षांकडून शक्‍तीप्रदर्शन केले जाते. यामुळे कायदा सुव्यवस्थाही बिघडत असते. निवडणूक प्रक्रिया शांततेत होण्यासाठी हे सर्व टाळण्यात येणार आहे.

विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्यादृष्‍टीने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी अर्ज दाखल करताना कोणत्‍या नियमांचे पालन करावे, काय करू नये, परिसरात मिरवणुका, सभा घेण्यास प्रतिबंध असल्‍याचे आदेश लागू केले आहेत. तरीही गर्दी झाली किंवा सभा झाली तर त्याचा खर्च आणि तपशील संबंधितांकडून घेतला जाईल. उमेदवारांना जी खर्चाची मर्यादा घालून दिली आहे त्यात तो खर्च धरला जाईल. -आकाश लिगाडे, निवडणूक निर्णय अधिकारी, चिपळूण

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 19-10-2024