चिपळूण : कोळकेवाडीत ‘चला वीज बनवूया’ प्रात्यक्षिक

चिपळूण : श्रमिक सहयोग संचालित ‘प्रयोगभूमी’मधील ‘चला वीज बनवूया’ हे पावसाळी संमेलन उत्साहात झाले. २००४ मध्ये कोळकेवाडी गावातील १७ एकर जमिनीवर प्रयोगभूमी स्थापन झाली. त्यावेळी येथे वीज नव्हती. फेब्रुवारी २००६ मध्ये नागालँडमध्ये अभ्यासासाठी गेलेल्या कार्यकत्यांनी तेथील शासनाकडून या तीन किलोवॅट क्षमतेचे हैड्रोजर हे सूक्ष्म जलविद्युत निर्मिती मशीन आणले. ३० जुलैला या मशिनद्वारे वाहत्या पाण्यावर वीज तयार होऊन तब्बल दोन वर्षे अंधारात असलेली ‘प्रयोगभूमी’ स्वनिर्मित विजेने उजळून निघाली. त्याचे स्मरण म्हणून ऊर्जा स्वावलंबनाचे मूल्य समाजात प्रसारित व्हावे, या हेतूने दरवर्षी ‘चला वीज बनवूया’ हे पावसाळी संमेलन आयोजित केले जाते. यावर्षी नेहमीच्या उत्साहात हे संमेलन झाले. कोणताही औपचारिकपणाचा आव न आणता सामूहिक ऊर्जेची देवाणघेवाण करण्यात आली.

ग्रामीण भागातून तसेच शहरातून आलेले पाहुणे प्रयोगभूमी आणि वाडी शिक्षणकेंद्रातील मुले, शिक्षक सारे जण एकोप्याने संमेलनात सहभागी झाले होते. सुरुवातीला संस्थेच्या कार्याचा परिचय मांडण्यात आला. ज्यात राजन इंदुलकर, रेखा मोहिते, विठ्ठल निकम यांनी मांडणी केली. त्यानंतर हैड्रोजर या सूक्ष्म जलविद्युत निर्मिती मशिनद्वारे वीजनिर्मितीचे प्रात्यक्षिक आणि त्यावरील सादरीकरण हे सत्र संतोष पुरोहित आणि भार्गव पवार यांनी संचलित केले. पुढील सत्रात सहभागी मुलांचे गट पाडण्यात येऊन त्यांना परिसरात फिरून नैसर्गिक साधनांपासून निर्मिती करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मुलांनी पानाफुलांपासून तयार केलेल्या माळा, दागिने, गुच्छ, फुगे आदींचे प्रात्यक्षिक दाखवले.

या सत्राचा समारोप अक्षर नंदन या संस्थेच्या संचालक गौरी देशमुख आणि साहित्यिक वंदना भागवत यांच्या मनोगताने केला. त्यानंतर संगीत संध्या, सामूहिक नृत्य, जंगलफेरी, जलविहार अशा प्रकारे हे संमेलन झाले. पंढरपूर येथून दादासाहेब रोंगे व त्यांचे सहकारी, चिपळूण येथील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. श्रुतिका कोतकुंडे, खादी ग्रामोद्योगच्या निवृत्त व्यवस्थापक प्रज्ञा जोगळेकर, उद्योजक सुप्रिया वरखेडे-काळे, सलील काळे, दिनेश कदम, आदिम आदिवासी कातकरी संघटनेचे चिपळूण तालुकाध्यक्ष महेश जाधव, वसुधा पाटील, दीपक महाडिक, प्रज्ञा मोने, शाहीन इंदुलकर, सावित्री इंदुलकर, रुस्तुम तांबे आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:19 PM 15/Aug/2025