राजापूर : महाळुंगेत वहाळाचे पाणी भात शेतात

राजापूर : गेल्या काही दिवसांपासून तालुक्यामध्ये परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. विजांच्या कडकडाटासह दिवसा रात्री जोरदारपणे कोसळणाऱ्या या पावसाने भातशेती धोक्यात आली आहे. परतीच्या पावसामध्ये महाळुंगे येथील वहाळाच्या पाण्यामध्ये वाढ होऊन वहाळाचे पाणी शेतामध्ये घुसल्याने शेतीचे नुकसान झाले.

गेले पंधरा दिवस तालुक्यामध्ये पाऊस पडत आहे. गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पडणाऱ्या पावसामुळे विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. या पावसामुळे कापणीची कामे रखडली आहेत. अनेक ठिकाणी भातशेती आडवी झाली असून, लोंब्यामधील दाण्यांना नव्याने कोंब आले आहेत. गुरुवारी (ता. १७) दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. दुपारनंतर जोरदार पावसाला सुरवात झाली. तालुक्यातील महाळुंगे येथील वहाळांच्या पाण्यामध्ये वाढ झाली आणि पाणी शेजारील शेतांमध्ये घुसले. आधीच पावसामुळे आडव्या झालेल्या भातशेतीत वहाळाचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे प्रशासनाकडून तत्काळ पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

विजेचा लपंडाव
राजापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत आहे. विजांच्या कडकडाटांसह पडणाऱ्या पावसाबरोबर विजेचाही लपंडाव सुरू आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. पाऊस आणि विजेचा खेळखंडोबा या दोन्हीमुळे शेतकऱ्यांची कापणीची कामे अनेक ठिकाणी रखडली आहेत. याकडे महावितरणने लक्ष देऊन विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणीही होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 AM 19/Oct/2024