रायफल शुटिंगमध्ये महाराष्ट्रात अव्वल आलेल्या ऐश्वर्य सावंतचा स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गौरव

रत्नागिरी : राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करत महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावणाऱ्या रत्नागिरीच्या ऐश्वर्य दिनेश सावंत याचा आज ७९ व्या स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्यात जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. पोलीस परेड ग्राऊंडवर झालेल्या या गौरव सोहळ्यामुळे एका उदयोन्मुख खेळाडूच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त रत्नागिरीच्या पोलीस परेड ग्राऊंडवर मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. या कार्यक्रमादरम्यान, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रत्नागिरीतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये ऐश्वर्य सावंत याच्या कामगिरीची विशेष दखल घेण्यात आली.

ऐश्वर्य दिनेश सावंत याने मध्य प्रदेशातील महो, इंदूर येथे झालेल्या ३०० मीटर बिगबोर इंडिया ओपन रायफल शूटिंग स्पर्धेत सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या स्पर्धेत ऐश्वर्यने ३०० पैकी २९१ गुण मिळवत महाराष्ट्रातून पहिला क्रमांक मिळवण्याचा बहुमान पटकावला.

राष्ट्रीय स्तरावर रत्नागिरी जिल्ह्याचे नाव उज्वल करणाऱ्या त्याच्या या कामगिरीचे कौतुक म्हणून पालकमंत्री उदय सामंत यांनी स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य सोहळ्यात त्याचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. या सत्कारामुळे ऐश्वर्यला पुढील वाटचालीस मोठे प्रोत्साहन मिळाले आहे.