मुंबई : मुंबई महानगरपालिकेनं कार्यकारी सहायक म्हणजेच लिपीक पदाच्या भरतीची जाहिरात नव्यानं प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये पहिल्या प्रयत्नात दहावी आणि पदवी उत्तीर्ण असल्यासंदर्भातील अट काढून टाकण्यात आलेली आहे.
मुंबई महापालिकेनं कार्यकारी सहायक पदाच्या 1846 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या पदांसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 9 सप्टेंबर निश्चित करण्यात आली होती. मात्र, नोकरभरतीची तयारी करणारे विद्यार्थी, राजकीय नेते यांच्याकडून पहिल्या प्रयत्नात दहावी आणि पदवी उत्तीर्ण असल्यासंदर्भातील अट काढून टाकण्यासंदर्भात मुंबई महापालिकेशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. अखेर मुंबई महापालिका प्रशासनानं या मागणीची दखल घेत अट काढून टाकत असल्याची घोषणा करत नव्यानं जाहिरात प्रसिद्ध करू असं म्हटलं होतं. त्यानुसार आता मुंबई महापालिकेनं जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
जाणून घ्या नवं वेळापत्रक?
मुंबई महापालिकेच्या कार्यकारी सहायक पदाच्या भरतीसाठी अर्ज सादर करण्यासाठी 21 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. तर, अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 11 ऑक्टोबर रोजी रात्री 11.59 मिनिटांपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 1 हजार रुपये शुल्क भरावं लागेल. तर, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 900 रुपये शुल्क अर्ज सादर करावे लागतील.
जुन्या जाहिरातीत अर्ज केलेल्या उमेदवारांचं काय?
मुंबई महापालिकेनं जारी केलेल्या जुन्या भरतीत उमेदवारांना पुन्हा अर्ज सादर करावे लागणार नाहीत. मुंबई महापालिकेनं यासंर्भात जाहिरातीमध्ये स्पष्टीकरण दिलं आहे.
कार्यकारी सहायक पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्रतेच्या अटी
उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा. मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा इतर शाखांचा पदवीधर असावा.माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे. ‘एम.एस.सी.आय. टी’ परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. याशिवाय उमेदवारांना संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे.
प्रकल्पग्रस्त अन् टंकलेखनाच्या अटीवरुन विद्यार्थी आक्रमक
मुंबई आणि ठाणे येथील प्रकल्पग्रस्त उमेदवार अर्ज करू शकतात ही अट रद्द करुन संपुर्ण महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्यास पात्र करावे. मराठी किंवा इंग्रजी या दोन्ही पैकी कोणतेही एकच टंकलेखनाचं प्रमाणपत्र ग्राह्य धरावं अशी मागणी विद्यार्थ्यांची आहे.