Ratnagiri : ‘उबाठा’ गटाचा उमेदवार पुढील दोन दिवसात निश्चित होणार

रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून कोण असणार, याबाबत मतदारांमध्ये जोरदार चर्चा सुरु झाली आहे. उबाठाकडून माजी जि.प. अध्यक्ष उदय बने, सहसंपर्कप्रमुख राजू महाडीक आणि भाजपाचे माजी आमदार बाळ माने यांच्या नावाची चर्चा आहे. दरम्यान, दोन दिवसात रत्नागिरीचा उमेदवार जाहीर होईल, असे माजी खासदार व उबाठाचे सचिव विनायक राऊत यांनी सांगितले.

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निष्ठावंतांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी पक्ष कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांकडून करण्यात आली आहे. या मतदार संघात माजी जि.प. अध्यक्ष उदय बने, सहसंपर्कप्रमुख राजू महाडीक यांच्या नावाची चर्चा आहे. यातच भाजपाचे माजी आमदार बाळ माने हे उबाठामध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतल्याचेही मतदारसंघात चर्चा आहे. पक्षनेतृत्वाने संधी दिल्यास निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी खास कार्यकर्त्यांना सांगितले आहे.

दरम्यान, स्वत: माजी आमदार बाळ माने यांनी लवकरच निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर त्यांनी विधानसभा मतदार संघात दौराही सुरु केला असून, आपली मते ते कार्यकर्ते व ग्रामीण भागातील पदाधिकार्‍यांसमोर मांडत आहेत. व उमेदवारी फिक्स झाल्यानंतरच बाळ माने उबाठामध्ये पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे. मात्र येत्या दोनतीन दिवसात रत्नागिरी विधानसभेचा उमेदवार निश्चित केला जाणार असल्याचे माजी खा. विनायक राऊत यांनी सांगितले. याबाबत तीन नावे समोर असून, त्यातीलच एक उमेदवार निश्चित होणार असल्याचे स्पष्ट केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 19-10-2024