चिपळूण-मुसाड मार्गावर एस.टी. बस खड्ड्यांमुळे गटारात कलंडली

चिपळूण : चिपळूण-मुसाड मार्गावर धावणारी चिपळूणच्या दिशेने येणारी एस.टी. बस खड्ड्यांमुळे गटारात कलंडली. ही घटना शुक्रवारी (दि.१८) सकाळी १० च्या सुमारास घडली. बसमध्ये ७० प्रवासी होते. मात्र, सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.

चिपळूण एस.टी. आगारातून सकाळी ८ वाजता सुटलेली मुसाड बस खांदाटपाली मार्गे मुसाड गावी आली. पुन्हा सकाळी मुसाडहून चिपळूणच्या दिशेने येण्यासाठी १० वाजण्याच्या निघाली. ही गाडी पाली येथे माजी सरपंच अजय महाडिक यांच्या घरासमोर उतारात आली असता रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि ही बस रस्त्यालगतच्या गटारामध्ये कलंडून अपघातग्रस्त झाली.

ही घटना घडली तेव्हा बसमध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह ७० प्रवासी प्रवासी करीत होते. या अपघातातील बस सुदैवाने ही बस थांबल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा, ही बस पुढच्या बाजूला येऊन घरावर धडकली असती.

पाली फाटा ते निरबाडे रस्ता खड्डेमय
पाली फाटा ते निरबाडे या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे सातत्याने चारचाकी व दुचाकींचे अपघात होत आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थ तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. या रस्त्यावरील खड्डे तत्काळ भरावेत, अशी मागणी होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 AM 19/Oct/2024