रत्नागिरी : गर्दीचा फायदा घेऊन अनेक फुकटे प्रवासी विनातिकीट प्रवास करतात, तर काही वाहक तिकिटाच्या पैशात हेराफेरी करत असल्यामुळे एसटी विभागाच्या वतीने विविध मार्गावर तपासणी केली जाते. यामध्ये वाहक, प्रवासी दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येत आहे. वर्षभरात रत्नागिरी विभागातील ११५ वाहकांनी तिकिटाच्या पैशात हेराफेरी करत पैसे खिशात टाकल्यामुळेव विविध कारणांसाठी कारवाई करण्यात आली. एप्रिल २०२४ ते जुलै २०२५ पर्यंत वर्षभरात गर्दीचा फायदा घेत १६२ प्रवाशांनी विनातिकीट प्रवास केल्यामुळे अशा फुकट्या प्रवाशांकडून ४४ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
आवडत्या लालपरीतून दररोज हजारो, लाखो प्रवास करीत असतात परवडणारे तिकीट, पाहिजे तिथे प्रवास, गावोगावी जाणाऱ्या बसेस यामुळे प्रवाशांची एसटीला पहिली पसंती असते. त्यामुळे अनेक जण एसटीतूनच प्रवास करतात. इतर गाड्यांपेक्षा एसटीला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. या गर्दीचा फायदा घेऊन काही फुकटे प्रवासी विनातिकीट प्रवास करतात, तर काही वाहक प्रवाशांना तिकिटाचे पैसे घेतात मात्र तिकीट न देता स्वतः च्या खिशात घालतात. मधल्या थांब्यावर उत्तरलेल्या प्रवाशांकडचे तिकीट घेऊन नवीन प्रवाशांना दिले जाते व ते पैसे स्वत:कडे ठेवले जातात.
प्रवाशांनी दिलेल्या अधिकच्या पैशातून तिकिटाची रक्कम वजा करून उर्वरित पैसे परत न करणे, ड्युटी संपल्यानंतर जमा झालेले पैसे आगारात जमा न करणे अशा विविध कारणामुळे रत्नागिरी विभागातील ११५ वाहकांवर कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. २०२४-२५ च्या जुलैअखेरपर्यंत १६२ फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करीत ४४ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
अशी होते प्रवासी, वाहकांवर कारवाई
विनातिकीट प्रवाशांवर तिकिटाच्या रकमपेक्षा दुप्पट रक्कम वसूल केली जाते. तर वाहकाने तिकीटात हेराफेरी केली असल्यास तसेच दोषी आढळल्यास वाहकाला तीन महिन्यांसाठी निलंबनाची कारवाई होते. तसेच रक्कम महामंडळाकडे जमा करावी लागते.
विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली!
एसटी बसेसमध्ये विविध मार्गावर सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. प्रवास करताना विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या संख्याही दिवसेदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे भरारी पथकांनी तपासणी मोहीम वाढवावी. अशा फुकट्यांवर कारवाई करावी. तसेच वाहकांवर ही नजर ठेवणे गरजेची आहे. तिकिटात हेराफेरी करणाऱ्या वाहकावर ही कारवाई करणे गरजेची आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
1:11 PM 18/Aug/2025









