Dams overflow in Konkan : कोकणातील सर्व धरणे 100 टक्के भरली

ठाणे : कोकणात सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने कुंडलिका, अंबा जगबुडीसह पाच नद्यांना पूर आला होता. पावसाच्या या शेवटच्याटप्प्यात कोकणातील सर्व धरणे 100 टक्के भरली. ठाण्याला पाणी पुरवठा करणारे बारवीही ओव्हर फ्लो झाले आहे. रायगड जिल्ह्यातील 26 च्या 26 धरणे 100 टक्के भरली आहेत. सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील सर्व धरणांमध्ये 100 टक्के पाणी साठा झाला आहे.

ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे एमआयडीसीचे बारवी धरण शनिवारी दुपारी साडेतीन वाजता पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागले. बारवी धरणात सध्या 339.20 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. बारवी धरणाची उंची 72.55 मीटर इतकी असून धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर ते 72.60 मीटर इतक्या उंचीवरून पुर्ण ओसंडून वाहू लागले आहे.

बारवी धरणावरील अकरा स्वयंचलित दरवाजांच्या वाटे 4.40 क्यूसेक पाणी ओसंडून वाहत असल्याने ठाणे जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. ठाणे जिल्ह्यातील सहा महानगरपालिका, दोन नगरपालिका आणि औद्योगिक क्षेत्राला बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे हे धरण पूर्ण क्षमतेने ऑगस्टच्या महिन्याच्या मधोमध भरल्यामुळे पुढील वर्षभर ठाणे जिल्ह्यावरील पाणी कपातीचे संकट टाळणार आहे.

रायगड जिल्ह्यात शुक्रवारपासून मुसळधार पावसाची संततधार सुरू असून, जिल्हा प्रशासन आणि हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रोहा तालुक्यातील कुंडलिका आणि नागोठणे येथील अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. गुरुवारपासून पावसाची संततधार सुरू आहे. अलिबाग, रोहा नागोठणे, पोलादपूर श्रीवर्धन, म्हसळा, पनवेल, मुरूड, श्रीवर्धन, तळा या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर होता.

दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पावसाची दमदार बॅटींग सुरू झाली आहे. चिपळूण, संगमेश्वर, दापोली, मंडणगड, खेड तालुक्यात पाऊस धो-धो पडत आहे. पावसामुळे जिल्ह्यातील खेड-भरणे पूल येथील जगबुडी नदी 5.20 मीटर पाणी तर राजापूर येथील कोदवली नदीमध्ये 6 मीटर पाणी आल्यामुळे या दोन्ही नद्या इशारा पातळी ओलांडली आहे. जगबुडी नदी- 5.20, वाशिष्ठी नदी-3.50, शास्त्री नदी 4.20, सोनवी 3.80, काजळी -15.38, कोदवली- 6 मी, मुचकुंदी-1.95 तर बावनदी- 5.67 मी इतकी पाण्याची स्थिती आहे. सिंधुदुर्गातही सर्वदूर मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नद्या, धरणे भरली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:06 18-08-2025