काळाचा घाला! आईच्या अंत्यविधीवेळीच मुलाला मृत्यूने गाठले; संगमेश्वर तालुक्यातील घटनेने हळहळ

देवरुख, १८ ऑगस्ट :
आईच्या मृत्यूच्या दुःखात असलेल्या मुलावर, तिच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमावेळीच काळाने घाला घातल्याची एक हृदयद्रावक घटना संगमेश्वर तालुक्यातील मेढे तर्फे देवळे गावात घडली आहे. आईवर अंत्यसंस्कार सुरू असतानाच मुलाला अचानक चक्कर आली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

याप्रकरणी अभिजीत जयवंत मेढे (वय ४२) यांनी देवरुख पोलिसांना माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयत तरुणाची आई शनिवारी (दि. १६ ऑगस्ट) मरण पावली होती. त्यामुळे तो आईच्या अंत्यविधीसाठी आपल्या मूळ गावी मेढे तर्फे देवळे येथे आला होता.

काल, रविवारी (दि. १७) सकाळी स्मशानभूमीत आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराचे विधी सुरू असताना, त्याला अचानक तीव्र चक्कर आली आणि तो जागीच कोसळला. हा प्रकार पाहून नातेवाईकांना मोठा धक्का बसला. त्यांनी तात्काळ त्याला उपचारासाठी साखरपा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

एकाच कुटुंबात दोन दिवसांत दोन मृत्यू झाल्याने मेढे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी देवरुख पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील कार्यवाही सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:35 18-08-2025