काँग्रेसने आत्ताच मतदार याद्या तपासाव्या, निवडणूक हरल्यावर अपयशाचे खापर फोडू नये : चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : विधानसभा निवडणुका ज्या मतदान याद्यांवर झाल्या त्याच याद्यांवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे काँग्रेस नेत्यांचे काही आक्षेप असतील तर ते त्यांनी आत्ताच निवडणूक आयोगाकडे मांडावे.

नाहीतर पुन्हा निवडणूक हरल्यानंतर अपयशाचे खापर मतदार यादीवर फोडू नये, असे आवाहन राज्याचे महसुल मंत्री आणि नागपूर तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे.

श्री. बावनकुळे पुढे म्हणाले की, निवडणुकीच्या काळात मतदार याद्या जाहीर होतात. त्यावेळी सर्वच पक्षांना आक्षेप घेण्यासाठी वेळ दिला जातो. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एक लाख बुथवर याद्या लावल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याने आक्षेप घेतला नाही. निवडणुकीच्या काळातही आक्षेप घेतले नाही. मात्र, निवडणुका झाल्यावर सात महिन्यानंतर राहुल गांधी यांनी आक्षेप घेतला.

महाराष्ट्रात जेव्हा काँग्रेसचे ३१ खासदार निवडून आले. तेव्हा कुठलाही आक्षेप त्यांनी घेतला नाही, त्यावेळी मतदार याद्या बरोबर होत्या. ज्या ठिकाणी भाजप निवडून येते त्याच ठिकाणी काँग्रेस पक्षाला आक्षेप असतो. मात्र, आम्हाला आमच्या अडीच लाख लाडक्या बहिनींनी मतदान केले, ४५ लाख शेतकऱ्यांचे वीजबिल माफ केले, त्यांनी आम्हाला मतदान केले. तसेच कामठी विधानसभा मतदान संघामध्ये १७ हजार बूथ लावून आम्ही नवीन मतदार नोंदणी केली. त्यात ३४ हजार मतदार वाढले. मतांची वाढ होणे म्हणजे मतदार यादी चुकीची आहे असे होत नाही. त्यामुळे राहुल गांधींना आवाहन आहे की, त्यांना शंका असेल तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदार याद्या तपासून घ्याव्या, यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील त्यांच्या कार्यकर्त्यांना कामाला लावावे.

श्री. बावनकुळे यांनी पुढे सांगितले की, माझे नाव वापरून छत्रपती संभाजीनगर येथील नागरिकाची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तहसीलदाराच्या खुर्चीवर बसून गाणी म्हणणाऱ्या तहसीलदाराला आम्ही तत्काळ निलंबित केले आहे.

मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण व मी महाराष्ट्रामध्ये प्रवास करीत असताना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक महायुतीतच लढण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु, जिथे शक्य नाही तिथे लढत मैत्रीपूर्ण करून महायुतीला धक्का बसणार नाही याची काळजी स्थानिक नेत्यांनी घ्यायची आहे.

राज्यात ज्या ज्या ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे, त्या त्या ठिकाणी पंचनामे करून एसडीआरएफ व एनडीआरएफ यांच्या निकषांनुसार नुकसान भरपाई देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नंदुरबारसह अनेक आदिवासी जिल्ह्यांमध्ये धर्मांतराच्या उद्देशाने बांधलेले अनधिकृत चर्च हटवण्याचे निर्देश संबंधित जिल्हा दंडाधिकाऱ्यांना देण्यात आले, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:37 18-08-2025