खेड रेल्वेस्थानकाच्या छताला गळती

खेड : तालुक्यातील ग्रामीण भागासह शहराला परतीच्या पावसाचा तडाखा बसलेला आहे. वेगवान वाऱ्यासह पडणाऱ्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. त्याचा फटका खेड रेल्वेस्थानकावर करण्यात आलेल्या सुशोभीकरणाच्या कामाला बसला आहे. नव्याने बांधलेल्या छताला गळती लागली असून, त्या कामाबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

कोकण रेल्वेमार्गावरील महत्वाच्या स्थानकांचे सुशोभीकरण राज्य शासनाकडून करण्यात आले आहे. त्यासाठी सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले होते. सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर चारच दिवसात त्याचे लोकार्पण करण्यात आले. या उद्‍घाटन कार्यक्रमाला काही दिवसही लोटलेले नाहीत त्या आधीच स्थानकाच्या सुशोभीकरणाच्या कामाच्या दर्जाबाबत शंका निर्माण झाली आहे. गेले दोन दिवस खेड तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसात खेड रेल्वेस्थानकाचे नव्याने बांधलेल्या छतामधून पाण्याच्या धारा कोसळू लागल्या आहेत. छत उभारताना काँक्रिटीकरण केले आहे की, दिखाऊपणा केला गेला आहे असा प्रश्न निर्माण झालेला आहे.

तत्पूर्वी, रत्नागिरी रेल्वेस्थानकातील पीओपीही अशाच पद्धतीने खाली पडले होते. त्यामधूनही पाण्याच्या धारा वाहत होत्या. दर्जेदार कामाची अपेक्षा असतानाच पहिल्याच पावसात अशी स्थिती असेल तर भविष्यात हे काम किती तग धरेल, याबाबत खेडवासियांमधून शंका उपस्थित केली जात आहे. परतीचा पावसाचा राज्यातील अनेक भागाला फटका बसला आहे. कोकणात पावसाचे प्रमाण अधिक आहे. अशातच खेड रेल्वेस्थानकाच्या छताला मोठी गळती लागली आहे. त्याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. यावर वेळेत उपाययोजना नाही केली तर हा त्रास पुढे अजून किती दिवस सहन करावा लागेल हे सांगता येत नाही. आचारसंहितेच्या काळात रेल्वे प्रशासन याकडे लक्षे देईल का? तातडीने उपाययोजना करेल का? अशी शंकाही प्रवाशांतून व्यक्त होत आहे.

दुरुस्तीचे काम नव्याने करा
पावसामध्ये लागलेल्या गळतीच्या दुरुस्तीचे काम नव्याने सुरू करावे, अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे. कोकणात मुसळधार पाऊस पडतो हे लक्षात घेऊन कामाचा दर्जा ठेवावा लागतो तसेच हे काम करणाऱ्याचीही चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 19-10-2024