‘जलजीवन’च्या ठेकेदारांची देयके अदा करा; ठेकेदार संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

चिपळूण : गेल्या दीड वर्षापासून जलजीवन योजनेची कामे करणाऱ्या ठेकेदारांची बिले अद्याप मिळाली नाहीत. ठेकेदार आर्थिक दृष्ट्या अडचणीत आले असून ठेकेदारांची देयके लवकरच अदा करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत लाड यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जल जीवन मिशन योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची कामे झाली आहेत. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून ठेकेदारांची देयके अदा झालेली नाहीत. यामुळे ठेकेदार आर्थिक दृष्ट्या अडचणीत आले आहेत. या योजनेच्या कामांसाठी ठेकेदारांनी बँकांकडून कर्ज व उसनवारी करून कामे पूर्णत्वास नेली आहेत. मात्र ठेकेदारांची देयके अदा न झाल्याने ठेकेदार नैराश्याच्या गर्तेत सापडले आहेत. याच अनुषंगाने गेल्या महिन्याभरापूर्वी सांगली येथील हर्षल पाटील या ठेकेदाराने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना देखील ठेकेदारांच्या देयकां संदर्भात शासन प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत लाड यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांची भेट घेऊन ठेकेदारांच्या थकीत देयकांसंदर्भात चर्चा करण्यात आली.

निधी उपलब्ध करून देणे तसेच ठेकेदारांना काम करत असताना येणाऱ्या विविध अडचणी व बिलातून कटिंग करून घेतलेली सुरक्षा अनामत रक्कम ठेकेदारांना परत देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. रत्नागिरी यांनी आपण निवेदनाद्वारे केलेली निधी उपलब्ध करण्याची मागणी प्रशासनापर्यंत पोहोचवली जाईल व सुरक्षा अनामत रक्कम ठेकेदारांना परत देण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद यावेळी त्यांनी दिला.

यावेळी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा संघटनेचे अध्यक्ष प्रशांत लाड, प्रसाद आवले, रुत्वीज घाग, सुरेश खापले, एस. आर. शिंदे, दशरथ दाभोळकर, अमित मागले, मानस जागुष्टे, विजय पवार, सूरज सावंत, सागर मागले, नितीन कदम यांच्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील ५० पेक्षा अधिक ठेकेदार उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 19/Aug/2025