संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यात रविवारी (ता. १७) रात्री साडेसातच्या सुमारास खंडित झालेला वीजपुरवठा सलग २१ तास बंद होता. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आणि या कामाचे योग्य नियोजन करण्यासाठी महावितरणचे अभियंता संगमेश्वर येथे उपस्थित नसल्याने पूर्ण तालुक्याचा वीजपुरवठा खंडित होता.
रविवारी सकाळी ११ वाजता संगमेश्वर तालुक्याला वीजपुरवठा न करणारी निवळी-संगमेश्वर ही ३३ केव्ही क्षमतेची वीजवाहिनी नादुरुस्त झाली. यानंतर ही वीजवाहिनी तत्काळ दुरुस्त करण्यासाठी कोणतीही हालचाल केली गेली नाही. दिवसभरात या वीजवाहिनीकडे योग्य नियोजनाअभावी लक्ष दिले गेले नसल्याने निवळी संगमेश्वर वीजपुरवठा सुरू होऊ शकला नाही. निवळी संगमेश्वर ३३ केव्ही क्षमतेची वीजवाहिनी नादुरुस्त असतानाच रविवारी रात्री ७.३० वा. दरम्यान आरवली ते संगमेश्वर ही ३३ केव्ही क्षमतेची दुसरी वीजवाहिनी नादुरुस्त झाली. दोन्ही बाजूने संगमेश्वर तालुक्याला होणारा वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणचे कर्मचारी संगमेश्वर-आरवली या ३३ केव्ही वीजवाहिनीवर दुरुस्तीचे काम करण्यासाठी रवाना झाले होते; मात्र मुसळधार पाऊस, रात्रीची वेळ आणि जंगलभागातून गेलेली वीजवाहिनी यामुळे आरवली-संगमेश्वर ही ३३ केव्ही क्षमतेची वीजवाहिनी दुरुस्त होऊ शकली नाही, असे महावितरणतर्फे सांगण्यात आले.
गणेशोत्सवामुळे कारखान्यात मोठी लगबग सुरू आहे; मात्र सलग २१ तास वीजपुरवठा खंडित राहिल्याने गणेशमूर्ती कारखानदारांनीदेखील महावितरणविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. आरवली ते संगमेश्वर या ३३ केव्ही क्षमतेच्या वीजवाहिनीवर रविवारी रात्री थांबवलेले दुरुस्तीचे काम करण्यासाठी सोमवारी सकाळी महावितरणचे कर्मचारी रवाना झाले. रात्रभर खंडित असलेला संगमेश्वर तालुक्याचा वीजपुरवठा सकाळी १० वाजेपर्यंत सुरू होईल, अशी अपेक्षा होती; मात्र प्रत्यक्ष वीजपुरवठा सुरू होण्यास दुपारचे ४.३० वाजून गेले.
गणेशोत्सवात महावितरणकडून असाच बेजबाबदार कारभार केला गेला, तर ग्राहकांचा संताप उफाळून येईल. संगमेश्वर महावितरणच्या कारभाराला कोणीच वाली नाही, अशी स्थिती यातून पुढे आली. लोकप्रतिनिधींसह महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी संगमेश्वर येथील खंडित वीजपुरवठा प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी- राकेश जाधव, सामाजिक कार्यकर्ता, असुर्डे
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना महावितरणकडून सलग २१ तास वीजपुरवठा खंडित राहतो. मग ऐन गणेशोत्सवात चांगल्या सेवेची हमी कशी मिळेल, असा सवाल ग्राहकांनी उपस्थित केला असून, या घटनेकडे लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने पाहिले नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. महावितरणने संगमेश्वर तालुकावासीयांच्या भावनांचा अंत पाहू नये. विनोद म्हस्के, सामाजिक कार्यकर्ते, संगमेश्वर
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 AM 19/Aug/2025














