देवरूख : देवरूख शिक्षण प्रसारक मंडळ व संगमेश्वर तालुका माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने आयोजित तालुक्यातील १५ शाळांसाठी सीसीटीव्ही लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. राज्यात काही शाळांमध्ये घडलेला लैंगिक शोषणाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महिला व मुलींची सुरक्षा निश्चित करण्यासाठी शासनाने सर्व शाळांनी एका महिन्याच्या आत सीसीटीव्ही बसवण्याचा आदेश जारी केला होता. संगमेश्वर तालुक्यातील ज्या शाळांना आर्थिक गरज असेल त्या शाळांना मदत देऊन हे काम पूर्ण करावे, अशी विनंती माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी मंडळाला केली होती.
त्यानुसार संस्था अध्यक्ष सदानंद भागवत, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष महावीर कुसनाळे व उपाध्यक्ष अमोल सरनोबत यांनी एकत्र येऊन संबंधित शाळेतील मुख्याध्यापकांची ऑनलाईन सभा घेतली. तातडीने कार्यवाही सुरू करून तालुक्यातील तब्बल १५ माध्यमिक शाळांना सीसीटीव्ही प्रणाली बसवली. श्रीमान तू. ग. गांधी विद्यालय कोंडगाव येथे सदर सीसीटीव्ही लोकार्पण सोहळा तालुका संस्था संघटनेचे सदर प्रणालीचे उद्घाटन माध्यमिक शिक्षणाधिकारी सावंत यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी प्रमुख पाहुणे मार्गदर्शक म्हणून देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत उपस्थित होते. तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या मुख्याध्यापिका रेमणे यांनी केले. प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष कुसनाळे यांनी तर उपस्थितांचे स्वागत उपाध्यक्ष सरनोबत यांनी केले.
विद्यार्थिनी सुरक्षेच्या महत्त्वाच्या प्रश्नासाठी योगदान देता आल्याचे समाधान वाटले, असे मत यावेळी सदानंद भागवत यांनी व्यक्त केले. १५ माध्यमिक शाळांत सीसीटीव्ही बसवण्यासाठी केलेल्या योगदानाबद्दल भागवत व सर्व शाळा तसेच संस्थांचे, तालुका मुख्याध्यापक संघाचेही अभिनंदन सुवर्णा सावंत यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:49 AM 19/Oct/2024









