रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला; जगबुडी नदी अजूनही धोका पातळीवर..

रत्नागिरी : गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर बुधवारी सकाळच्या सत्रात काहीसा ओसरलेला दिसून आला. दरम्यान, मंगळवारपर्यंत इशारा पातळीच्या वरून वाहणाऱ्या जिल्ह्यातील नद्यांचे पाणी बहुतांश ओसरले असून केवळ खेड तालुक्यातील जगबुडी नदी धोका पातळीच्या वरून वाहत आहे.

रत्नागिरी पाटबंधारे मंडळ पूरनियंत्रण कक्षाकडून बुधवारी सकाळी दहा वाजता मिळालेल्या अहवालानुसार, जगबुडी नदीची सध्याची पाण्याची पातळी 7.80 मीटर असून ती धोका पातळीच्या वर आहे. याखालोखाल राजापूर तालुक्यातील कोदवली नदी सुद्धा इशारा पातळीच्या वरून वाहत असून या नदीसाठी इशारा पातळी 4.90 मीटर इतकी आहे, मात्र सध्या ती 5.65 मीटर पातळीवरून वाहत आहे.

याउलट चिपळूण बाजारपेठेतील वाशिष्टी नदीचे पाणी मात्र ओसरू लागले असून नदीची इशारा पातळी 5 मीटर इतकी आहे. सध्या वाशिष्टी नदी 4.88 मीटर पातळीवर वाहत आहे. दरम्यान, संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री व सोनवी नद्या, लांजा तालुक्यातील काजळी व मुचकुंडी नद्या तसेच बावनदी या सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत. म्हणूनच, पावसाचा जोर काहीसा ओसरल्याचे स्पष्ट होत असून जिल्ह्यात पूरस्थिती हळूहळू आटोक्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:37 PM 20/Aug/2025