लांजामध्ये मोठी फसवणूक! मुथुट फायनान्सला कर्मचाऱ्यांनीच घातला २६ लाखांचा गंडा; व्यवस्थापकासह पाच जणांवर गुन्हा दाखल

लांजा, रत्नागिरी (प्रतिनिधी):

ग्राहकांनी तारण ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांमध्ये फेरफार करून आणि बनावट दागिने ठेवून तब्बल २६ लाख ८१ हजार रुपयांचा अपहार केल्याची धक्कादायक घटना लांजा येथील मुथुट फायनान्स लिमिटेड कंपनीच्या शाखेत उघडकीस आली आहे. या प्रकरणी कंपनीचे शाखा व्यवस्थापक आणि इतर चार कर्मचाऱ्यांनी संगनमताने हा घोटाळा केल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांच्या विरोधात लांजा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे लांजा शहरात आणि आर्थिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. २४ जून २०२४ ते ०५ मे २०२५ या कालावधीत हा अपहार झाला. कंपनीचे क्लस्टर मॅनेजर संजय चुडाजी राऊळ (वय-४४ वर्षे, रा. सावंतवाडी, सिंधुदुर्ग) यांनी १९ ऑगस्ट २०२५ रोजी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लांजा नगरपंचायत जवळ असलेल्या मुथुट फायनान्सच्या शाखेत काम करणाऱ्या आरोपींनी आपल्या पदाचा गैरवापर केला. त्यांनी ग्राहकांनी तारण ठेवलेल्या खऱ्या सोन्याच्या दागिन्यांमध्ये छेडछाड केली, काही दागिने बदलले आणि त्याजागी कमी प्रतीचे किंवा बनावट दागिने ठेवले. या बदलेल्या सोन्याची किंमत सध्याच्या बाजारभावानुसार २३,९६,००० रुपये (२७३.७ ग्रॅम) इतकी आहे.

इतकेच नाही, तर आरोपींनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत, कंपनीची कोणतीही परवानगी न घेता एका साक्षीदार ग्राहक कांता कमलाकर कुरुप यांना त्यांच्या तारण दागिन्यांच्या बदल्यात २,८५,००० रुपये देऊन कंपनीची आर्थिक फसवणूक केली. अशाप्रकारे एकूण २६,८१,००० रुपयांचा अपहार करून आरोपींनी कंपनीला मोठा आर्थिक फटका दिला आहे.

आरोपींची नावे:

१) सुनील तुकाराम गुरव (वय-५४ वर्षे): शाखा व्यवस्थापक (रा. करुळ, ता. वैभववाडी)
२) प्रसाद सीताराम रामाणे (वय-२८ वर्षे): ज्युनिअर रिलेशन एक्झिक्युटिव्ह (रा. लांजा आगरवाडी)
३) सुशांत सुनील धाडवे (वय-२७ वर्षे): रोखपाल व ज्युनिअर रिलेशन एक्झिक्युटिव्ह (रा. पाथरट, ता. रत्नागिरी)
४) ओंकार दिवाकर थारळी (वय-२६ वर्षे): ज्युनिअर रिलेशन एक्झिक्युटिव्ह (रा. मोगरे, ता. राजापूर)
५) तुषार गजानन वाडेकर (वय-२७ वर्षे): ज्युनिअर रिलेशन एक्झिक्युटिव्ह (रा. लांजा खावडकरवाडी)

या पाचही आरोपींविरोधात लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १६२/२०२५ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१६(१), ३१८(४) आणि ३(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे तारण ठेवलेल्या सोन्याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:30 20-08-2025