दापोली : उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस यांनी दाभोळ पोलीस ठाण्याला भेट देऊन स्थानिक परिस्थितीचा आढावा घेतला. या भेटीदरम्यान त्यांनी सामाजिक कार्यकर्ते, गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी तसेच पोलीस पाटील यांची बैठक घेऊन संपूर्ण दाभोळ परिसरातील सामाजिक वातावरण जाणून घेतले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. स्थानिक नागरिकांच्या अडचणी, सामाजिक प्रश्न तसेच उत्सव काळातील सुरक्षिततेच्या दृष्टीने घेण्यात येणाऱ्या उपाययोजना यांचा या चर्चेत समावेश होता.
उपविभागीय पोलीस अधिकारी सणस यांनी गणेशोत्सव मंडळांना उत्सव शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले. तसेच समाजातील सर्व घटकांनी परस्पर सहकार्य ठेवून उत्सव काळात सामाजिक सलोखा जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
या बैठकीमुळे पोलीस प्रशासन व नागरिक यांच्यातील संवाद अधिक मजबूत झाला असून आगामी काळात दाभोळ परिसरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी ही चर्चा उपयुक्त ठरणार आहे. यावेळी दाभोळ ग्रामस्थांसह खेड येथील सामाजिक कार्यकर्ते उत्तमकुमार जैन यांच्यासह पोलिस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:33 PM 20/Aug/2025














