संगमेश्वर : संगमेश्वर येथील नायरी-कातुर्डी मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असून, गेल्या पंधरा दिवसांत या मार्गावरील बसचा तिसऱ्यांदा अपघात झाला आहे. या बसमध्ये पन्नासपेक्षा अधिक प्रवासी होते. सुदैवाने, या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही.
बुधवारी (ता. २०) सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास कातुर्डीहून संगमेश्वरकडे येणारी परिवहन मंडळाची एसटी बस कोंडउमरे प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या पुढे आली असता समोरून वेगाने येणाऱ्या रिक्षाला बाजू देताना रस्त्याच्या बाजूला कलंडली. चालकाने प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठा अपघात टळला.
बसमध्ये ५०हून अधिक प्रवासी होते. पंधरा दिवसांपूर्वी याच परिसरात कातुर्डी गाडीने विद्युतखांबाला धडक दिल्यामुळे अपघात झाला होता. आठ दिवसापूर्वी संगमेश्वरहून कातुर्डीकडे जाणाऱ्या एसटी बसला कारभाटलेनजीक समोरून येणाऱ्या टेम्पोने धडक दिली होती. त्यात टेम्पोचालक गंभीर जखमी झाला होता तर दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. शास्त्रीपूल ते नायरी, निवळी, कातुर्डी हा मार्ग अरूंद असून वळणावळणांचा आहे. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज घेता येत नाही.
बसचालकांनी काळजीपूर्वक वाहने चालवावीत, अशा सूचना देवरूख आगारप्रमुखांनी द्याव्यात अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. कळंबस्ते तेलेवाडी येथील ग्रामस्थांनी उमरे मार्गावर वेगाने एसटी चालवणाऱ्या चालकांना समज दिली होती. एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 21/Aug/2025














