मंडणगड : तालुक्यात पावसामुळे तीन गावांमध्ये घरांची पडझड झाली. यामध्ये सुमारे १ लाख ७० हजार २४० रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली. १९ ऑगस्टला तालुक्यात १३०.८० मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. १९ ऑगस्टअखेर तालुक्यात २२११.८० मिमी पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या ६०.१२ टक्के इतका पाऊस पडून गेला आहे. गतवर्षी याच दिवशी तालुक्यात २८०२.७० मिलिमीटर पाऊस झाला होता. पावसामुळे मौजे लाटवण येथील चंद्रा मोतीराम जाधव यांच्या घराची पूर्णतः पडझड होऊन अंदाजे १ लाख ३० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नुकसानीचा पंचनामा महसूल विभागाने पूर्ण केला आहे.
गोठे येथील मिनेश मिलिंद जाधव यांच्या कच्च्या घराची अंशतः पडझड झाल्याने अंदाजे २४ हजार रुपयांचे नुकसान, मौजे नारायण नगर येथील विजय भिकू भोगल यांच्या घराची अंशतः पडझड झाल्याने अंदाजे १६ हजार २४० रुपयांचे नुकसान झाले असून, महसूल विभागाने नुकसानीचा पंचनामा पूर्ण केला आहे. पाऊस व पडझडीमुळे तालुक्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ग्रामीण भागातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम महसूल विभागाच्या वतीने सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 AM 21/Aug/2025














