संगमेश्वर : पुराच्या पाण्यात अडकली चारचाकी

संगमेश्वर : जवळच्या मार्गाचा अट्टाहास एका वाहनचालकाच्या अंगलट आल्याची घटना संगमेश्वर रामपेठ येथे घडली. पुराच्या पाण्यातून जाऊ नका, असा इशारा स्थानिकांनी देऊनही तो दुर्लक्षित करत चारचाकी चालकाने भरपावसात जवळच्या मार्गाने जाणे पसंत केले आणि तो फसला. चारचाकी पुराच्या पाण्यात अडकली. सुदैवाने, या प्रकारात जीवितहानी टळली असली तरीही मिठाई पॅकिंगसाठीचे बॉक्स पाण्यात भिजल्यामुळे आर्थिक नुकसान झाले आहे. हा प्रकार रामपेठ येथून भिडे वखारकडे जाणाऱ्या मार्गावर मंगळवारी सायंकाळी घडला.

सलग दोन दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे शास्त्री नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालेली होती. पुराचे पाणी रामपेठ तसेच नावडी भागातील सखल भागात साचू लागले होते तर अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याचे पाहायला मिळत होते. त्यातच विश्रांती न घेता पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. त्यामुळे वाहनवर्दळीसह जनजीवनावरही याचा चांगलाच परिणाम झाला. मुंबई-गोवा महामार्गावरून रामपेठमार्गे संगमेश्वर येथे जाण्यासाठी एक चारचाकी मालवाहू गाडी आली.

ती रामपेठ येथे आली असता येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल शेट्ये तसेच अन्य काही लोकांनी गाडीचालकाला तो जात असलेल्या पुढील मार्गावर पाणी भरले असल्याने भिडे वखार येथून न जाता दुसऱ्या मार्गाने जाण्याचा सल्ला दिला; मात्र चालकाने त्याकडे दुर्लक्ष केले आणि तो जवळच्या मार्गाने जाण्यासाठी वळला. त्याने पुराच्या पाण्यातून काही अंतरापर्यंत वाहन चालवत नेले; मात्र भिडे वखारीच्या समोर पाण्याची उंची जास्त असल्यामुळे चालक चांगलाच गडबडला. चहबाजूला पाणीच पाणी आणि मध्येच त्याची गाडी अडकल्यामुळे त्याने गाडी तेथेच सोडून पाण्यातून मार्ग काढत सुरक्षितस्थळी येणे पसंत केले.

अशी काढली चारचाकी बाहेर
पाऊस थांबण्याची चिन्हे नसल्यामुळे चारचाकी पाण्यातून काढण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ सरसावले. गाडी ढकलत ढकलत त्या पाण्यातून बाहेर काढण्यात आली. त्यामुळे गाडीही सुरक्षित राहिली; मात्र या गडबडीत गाडीतील बॉक्सचे नुकसान झाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 AM 21/Aug/2025