लांजा नगरपंचायतीमधून ‘डीडी’ गायब; अविनाश लाड यांची पोलिसात तक्रार

लांजा : काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी नगरपंचायत प्रशासनाकडील ‘डीडी’ चोरीला गेल्याप्रकरणी लांजा पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे. नगरपंचायत प्रशासनाकडीत बयाना रक्कमेचा ‘डीडी’ चोरीला जातोच कसा? असा प्रश्न उपस्थित होत असून, नगरपंचायत प्रशासनाचा हलगर्जीपणा उघडकीस आला आहे. यामुळे नगरपंचायत प्रशासनाविरोधात लांजा तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपंचायत प्रशासनाला धारेवर धरले होते.

लाड यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, लांजा नगरपंचायतमधील विकासकामांच्या निविदा स्थानिक बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे म्हणून मी स्वतः पुढाकार घेऊन एआयसी या कंपनीच्या नावाने १० कामांच्या निविदेमध्ये सहभाग घेतला होता; मात्र आमच्या निविदा उघडल्या जात नव्हत्या म्हणून आम्ही ११ ऑक्टोबर २०२४ ला नगरपंचायत येथे ठिय्या आंदोलन केले. या वेळी नगराध्यक्ष मनोहर बाईत हे स्वतः त्या ठिकाणी हजर झाले. या वेळी त्यांनी नगरपंचायतीचे अभियंता कमलाकर गराडे, विजय गुंडये, अनघा पाटकर व इतर कर्मचारी यांना बोलावून घेत आमच्या निविदा फाईल मागवल्या. त्या वेळी नगरपंचायतीच्या फाईलमध्ये बयाना व टेंडर फी डीडी दोन्ही असल्याचे उपस्थित सर्वांनी मान्य केले. त्यानंतर पुढील निर्णय १७ ऑक्टोबरला घेऊ, असे नगराध्यक्ष बाईत यांनी सांगितले; मात्र नगराध्यक्ष यांनी सांगितल्याप्रमाणे १७ ऑक्टोबरला नगरपंचायत येथे हजर राहिलो असता येथील अधिकारी यांनी फाईल दाखवली तेव्हा फाईलमधून डीडी गायब झाल्याचे निदर्शनास आले. डीडी चोरीला गेल्याचे नगरपंचायत प्रशासनाने सांगितले. चोरीला गेलेल्या डीडीबाबत योग्य दखल घेउन तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लाड यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:32 PM 19/Oct/2024